कोल्हापूरच्या तृप्तीने खेलो इंडियात पटकाविले ब्राँझपदक, जिल्ह्यात एकूण चार पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 04:40 PM2023-02-11T16:40:16+5:302023-02-11T16:43:03+5:30
तृप्ती आणूर गावात पहिलीच महिला कुस्ती पट्टू
दत्ता पाटील
म्हाकवे : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत कोल्हापूरच्या तृप्ती आप्पासो गुरव हिने ब्राँझपदक पटकाविले. आणूर (ता.कागल) येथील तृप्तीने ४६ किलो वजन गटात हे पदक पटकाविले. दिल्ली, हरयाणा, सांगली येथील मल्लांशी तिच्या लढती झाल्या. आणूर गावात पहिलीच महिला कुस्ती पट्टू बनलेल्या तृप्ती हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
ती सध्या गोखले महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकत आहे. तिने दोन वेळा शालेय स्पर्धेत राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. तिला वस्ताद शिवाजीराव जमनिक (बानगे) व कुस्तीकोच संदीप पाटील दोनवडे (ता.करवीर) यांचे मार्गदर्शन लाभले.
भुदरगडमधील ऋषिप्रसादला दोन रौप्य तर सानियाला कांस्यपदक
भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील दोन भूमिपुत्रांनी रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली आहे. खेडगे (ता.भुदरगड) येथील ऋषीप्रसाद संजय देसाई यांनी रीले आणि धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकावले. त्याने धावण्याच्या स्पर्धेत १०.६७ सेकंदात शंभर मीटर अंतर पार करून रौप्य पदक पटकावले. तर १०० × ४ या रिले प्रकारात देखील रौप्य पदक पटकावले.
तर, रायफल नेमबाजी स्पर्धेमध्ये गारगोटी येथील सानिया सुदेश सापळे हिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. सानिया हिने खेलो इंडियामधील हे पहिलेच पदक मिळवले आहे.