ताराबाई पार्क प्रभागात तिरंगी लढत--राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार अपक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 08:35 PM2017-09-20T20:35:54+5:302017-09-20T20:35:54+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी एकत्र लढणार असून, शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर दोन्ही कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही.
ताराबाई पार्क प्रभागात कोण-कोण उमेदवार असणार याबाबत गेल्या चार दिवसांपासून उत्सुकता होती; परंतु ती आता संपली आहे. कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक मंगळवारी (दि. १९) रात्री झाली. बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, गटनेता शारंगधर देशमुख, माजी महापौर आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, नगरसेवक मुरलीधर जाधव, राहुल माने, अफजल पीरजादे, विनायक फाळके, नंदकुमार मोरे उपस्थित होते. त्यांच्यासमोर उमेदवारी मागणाºया पाचजणांची नावे होती. त्यांतून रात्री राजेश लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘तुम्ही निर्णय घ्या व आम्हाला सांगा,’ असा निरोप दिल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली.
भाजप-ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश शिरोळकर यांचे नाव निश्चित केले असून, ते ताराराणी आघाडीच्या चिन्हावर लढणार आहेत. माजी नगरसेवक नीलेश देसाई यांच्यासह ताराराणी आघाडी व भाजपचे कार्यकर्ते शिरोळकर यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. देसाई यांनी त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे स्वत:कडे घेतली असून, त्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेकडून राजू जाधव (भोरी) यांची उमेदवारी निश्चित आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे.
पक्षीय भूमिका स्पष्ट झाल्यामुळे ताराराणी प्रभागात राजेश लाटकर, रत्नेश शिरोळकर, राजू जाधव (भोरी) अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, अन्य दोन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात असतील, असे चित्र आहे.
... तर राजेश लाटकर अपक्ष
भाजप-ताराराणी आघाडीचा उमेदवार कोण, चिन्ह कोणते असेल यावर राजेश लाटकर यांनी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची की नाही, हे ठरणार आहे. जर भाजप निवडणूक लढविणार असेल तर लाटकर यांनी राष्टÑवादीच्या चिन्हावर लढावे आणि ताराराणीचा उमेदवार असेल तर लाटकर अपक्ष म्हणून लढावे, असे बैठकीत ठरले.