बेळगाव, मिरज, कोल्हापूरची विजयी सलामी
By Admin | Published: October 28, 2014 12:02 AM2014-10-28T00:02:25+5:302014-10-28T00:18:13+5:30
गडहिंग्लज : युनायटेड करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनच्या सामन्यात बेळगावच्या दर्शन युनायटेड, तेरा फेरा, कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम मंडळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. स्पर्धेत केरळ, तेलंगणा, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नामवंत १६ संघ सहभागी झाले आहेत.
चुरशीच्या पहिल्या सामन्यात बेळगावच्या तेरा-फेरा फुटबॉल क्लबने तेलंगणाच्या फुटबॉल अकादमीचा २-१ ने पराभव केला. तेरा-फेराच्या अभिषेक चेरेफरने सलग दोन मैदानी गोल नोंदवून विजयाचा सिंहाचा वाटा उचलला. ‘तेलंगणा’तर्फे लोकमनने एकमेव गोल करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. ‘बेळगाव’च्या नजीब इनामदार, विकी, गोलरक्षक धनिषेक सावंत यांनी लक्षवेधी खेळ केला. तेलंगणाच्या अँथुनी, तौफिक व तेजा यांनी चांगली लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरच्या ‘बालगोपाल’ने अहमदनगरच्या शिवाजीयन्स संघाचा ट्रायबेकरमध्ये ४-३ ने पराभव केला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. ट्रायबेकरमध्ये कोल्हापूरच्या श्रेयश मोरे, रोहित कुरणे, महादेव तलवार, उत्सव मरळकर यांनी, तर अहमदनगरच्या आशिष भिंगारदिवे सुमित दिवार व महमद समिदा यांनी गोल केले.
तिसऱ्या सामन्यात बेळगावच्या दर्शन युनायटेडने गिजवणेच्या साई एज्युकेशन संघाचा ३-० असा पराभव करून एकतर्फी विजय मिळविला. बेळगावच्या निखिल जाधव, निखिल पाटील, अक्षय सिद्धनावर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले. गिजवणेच्या जनार्दन तोडकर, राजू सुतार, नितीन चौगुले यांनी चांगली लढत दिली.
मिरजेच्या रेल्वे ब्लू स्टारने खानापूर फुटबॉल असोसिएशनवर १-० असा निसटता विजय मिळविला. ‘मिरजे’च्या रोहित सातपुते याने निर्णायक गोल केला. खानापूरच्या फ्रान्सिस, अहमदनगरच्या अरीफ खान, तेलंगणाच्या अँथुनी व गिजवणेच्या अमित देसाई यांना लढवय्या खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, हसन मुश्रीफ फौंडेशनचे साजिद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, रमेश रेडेकर, दयानंद पाटील, आनंद पाटील, सुहास कुंभार, निजलिंगप्पा आरळी, सुनील चौगुले, जगदीश पट्टणशेट्टी, मल्लिकार्जुन बेल्लद, आदी उपस्थित होते. सुरेश कोळकी यांनी स्वागत केले. सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुपन्नावर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आजचे सामने
आजचे सामने
सकाळी ७. ३० वा. - बेळगाव तेरा-फेरा विरुद्ध प्रॅक्टिस क्लब, कोल्हापूर.
सकाळी ९ वा. - बेळगाव दर्शन युनायटेड विरुद्ध कस्टम केरळ
दुपारी १ वा. - बालगोपाल कोल्हापूर विरुद्ध डेक्कन रोवर्स, पुणे.
दुपारी ३.३० वा. - रेल्वे ब्लू स्टार मिरज विरुद्ध गडहिंग्लज युनायटेड.
सकाळी ७. ३० वा. - बेळगाव तेरा-फेरा विरुद्ध प्रॅक्टिस क्लब, कोल्हापूर.
सकाळी ९ वा. - बेळगाव दर्शन युनायटेड विरुद्ध कस्टम केरळ
दुपारी १ वा. - बालगोपाल कोल्हापूर विरुद्ध डेक्कन रोवर्स, पुणे.
दुपारी ३.३० वा. - रेल्वे ब्लू स्टार मिरज विरुद्ध गडहिंग्लज युनायटेड.