तिलारी घाटात ट्रक कोसळला, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातील दिरंगाईचा परिणाम; अधिकारी धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 05:17 PM2023-05-12T17:17:33+5:302023-05-12T17:17:49+5:30
अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असता ते निरुत्तर झाले
चंदगड : धोकादायक तिलारी घाटातील संरक्षक भिंतीचे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण करण्याआधीच बुधवारी (दि. १०) रात्री पुन्हा एकदा घाटातील अवजड वळणावर तामिळनाडूमधील एक ट्रक पलटी झाल्याने या प्रश्नाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला गांभीर्य नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. ॲड. संतोष मळवीकर यांनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.
तिलारी घाटातील संरक्षक भिंती जीर्ण झाल्या असून अनेक ठिकाणी त्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणावरून अनेक वाहने घाटात कोसळून जीवित व वित्तहानी झाली आहे. याबाबत मळवीकर यांनी गेल्याच आठवड्यात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाची बैठक घेतली. दोन दिवसात २ कोटी ७ लाखांच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता राजेंद्र सावंत यांनी दिले होते.
मात्र हे आश्वासन पाळण्यापूर्वीच आणखी एक ट्रक कोसळल्यामुळे संतापलेल्या मळवीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यड्रावकर यांना संरक्षक भिंतीच्या कामाचे काय झाले, असे विचारत धारेवर धरले. मात्र त्यांच्याकडे याबाबत खुलासा नसल्याने ते निरुत्तर झाले.
यावेळी संभाजी मळवीकर, परशराम पवार, अनिल गावडे, श्रीकांत गावडे, गोविंद गावडे, संतोष सुतार व हणमंत पाटील उपस्थित होते.
डोळे उघडणार?
सार्वजनिक बांधकाम विभागाला या धोकादायक तिलारी घाटाचे गांभीर्य नसल्याने मोठी घटना घडल्यावरच या खात्याचे डोळे उघडणार काय ? असा सवाल मळवीकर यांनी उपस्थित केला आहे.