साडेदहा लाखांच्या मद्यसाठ्यासह ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:13 PM2019-11-12T13:13:07+5:302019-11-12T13:15:10+5:30
कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्यावर घरपण फाटा येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडून सुमारे साडेदहा लाख किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्यावर घरपण फाटा येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडून सुमारे साडेदहा लाख किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
चालक काशिराम चंद्रकांत आंगणे (वय ३४, रा. पोईप, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली. ट्रक आणि मद्यसाठा असा सुमारे २२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांनी दिली.
आगामी ३१ डिसेंबर व नाताळ ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती विभागाचे उपनिरीक्षक जितेंद्र पवार यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार निरीक्षक एस. एस. साळवे, कुमार कोळी, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद्ध, योगेश शेलार, मोहन पाटील, नितीन ढेरे यांनी सोमवारी गगनबावडा रस्त्यावर सापळा लावला.
घरपण (ता. पन्हाळा) गावच्या हद्दीत अवैध मद्याची वाहतूक करीत असताना ट्रक (एमएच ०७ एजे-११६३) मिळून आला. त्यामध्ये १९२० सीलबंद प्लास्टिक बाटल्या, १६५ बीअरचे बॉक्स अशा सुमारे साडेदहा लाख किमतीच्या मद्यसाठ्यासह ट्रकही जप्त केला. गोव्याहून ही दारू आणली होती. ती कोल्हापुरात कोणाला विक्री केली जाणार होती की कोल्हापूरच्या बाहेर पाठविली जाणार होती, याची चौकशी सुरू आहे.