कर्नाटकातील कारखान्यातून साखर वाहतूक करणारा ट्रक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 09:04 PM2023-10-19T21:04:32+5:302023-10-19T21:05:19+5:30
कंटनरच्या चाव्या काढून घेतल्या असून काही साखर पोती रस्त्यावरच फेकण्यात आले आहे.
गणपती कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, कुरुंदवाड - कर्नाटकातील बेडकिहाळ येथील वेंकटेश्वरा साखर कारखाण्यातील साखर वाहतूक करत असलेले वीस कंटेनर गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास हेरवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अडवून धरली.
कंटनरच्या चाव्या काढून घेतल्या असून काही साखर पोती रस्त्यावरच फेकण्यात आले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेरवाडसह परीसरातील शेकडो स्वाभिमानी कार्यकर्ते जमा झाले असून कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कारखाण्याचे कार्यकारी संचालक, जबाबदार अधिकारी आणि खरेदी करणारे व्यापारी आल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अकिवाटचे माजी सरपंच विशाल चौगुले, शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, बाळासो माळी, योगेश जिवाजे, अविनाश गुदले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.