१६ नोव्हेंबरला पुन्हा रणशिंग

By admin | Published: November 6, 2015 12:25 AM2015-11-06T00:25:05+5:302015-11-06T00:32:18+5:30

टोल विरोधी आंदोलन : एन. डी. पाटील यांचा इशारा

The trumpet again on 16 November | १६ नोव्हेंबरला पुन्हा रणशिंग

१६ नोव्हेंबरला पुन्हा रणशिंग

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात आयआरबीच्या टोलवसुलीला शासनाने दिलेली तीन महिन्यांच्या स्थगितीची मुदत संपत आली आहे, टोलनाक्यांवर पुन्हा झाडलोट सुरू झाल्याने टोलवसुली पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला पुन्हा टोलला हद्दपार करण्यासाठी रणशिंग फुंकले जाणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी यावेळी केली.
कोल्हापूर शहर व जिल्हा टोलविरोधी कृती समितीच्यावतीने टोलला हद्दपार करण्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील बोलत होते. यावेळी महापालिकेत महापौर, उपमहापौर निवड असली तरीही त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. सोमवारी (दि. १६) सकाळी साडेदहा वाजता शिरोली टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी जमावे, तेथे टोलवसुली सुरू असेल तर ती पूर्ण ताकदीनिशी बंद पाडू, असाही इशारा यावेळी डॉ. पाटील यांनी दिला. बैठकीच्या निमंत्रकपदी निवासराव साळोखे होते.
राज्यात, महापालिकेत सत्तेत कोण आले, कोण येणार आहे याचे देणे-घेणे नाही, टोलविरोधात लढा प्रखरतेने उभा करण्यासाठी तारखा ठरवून नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, तोंडावर दिवाळी असल्याने जनतेच्या मर्यादा ओळखून कृती समितीने लढ्याचे पाऊल उचलावे. शासनाकडे अर्ज करून प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी तीव्र लढ्याची आवश्यकता आहे. आपण शासनाशी चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत, पण याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य शासनावर चळवळीच्या रेट्याची आवश्यकता आहे, त्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही ते म्हणाले. गेल्या तीन महिन्यांसाठी टोलवसुलीला स्थगिती होती, आता स्थगितीची मुदत संपत आल्याने टोलनाक्यांची साफसफाई सुरू झाली आहे. त्यामुळे टोलनाके सुरू होण्याचे संकेत आहेत. टोलचा मुद्दा कायमचा हद्दपार करण्यासाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दि. १६ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता शिरोली टोलनाक्यावर एकत्र येऊन टोलवसुली सर्वशक्तीनिशी बंद पाडू. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, धरणे आंदोलने आदी पुढील टप्प्यातील आंदोलने करून तीव्रता वाढवू, असेही सांगितले.
प्रारंभी निमंत्रक निवासराव साळोखे यांनी स्वागत, प्रास्ताविकपर भाषणात टोल आंदोलनाबाबत आढावा घेतला. सध्याचे आणि यापूर्वीचे सरकार टोल हद्दपार करण्याच्या थापा मारत असल्याचे सांगितले. टोल हद्दपार करण्यासंदर्भात जनतेचा रेटा लावणे गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, आर. के. पोवार, कॉ. चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, माजी आमदार बजरंग देसाई, कॉ. दिलीप पवार, यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली पाटील आदींनी आपली भूमिका मांडून टोलला हद्दपार करण्यासाठी एकत्र ताकद लावू, असेही आवाहन केले. यावेळी बाबा पार्टे, करवीर पंचायत समिती सदस्य राजू सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अरुण चोपदार आदी उपस्थित होते.

महापौर निवडीशी संबंध नाही
१६ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौर निवड असल्याची माहिती काहींनी यावेळी डॉ. पाटील यांना दिली; पण याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यावेळी पक्षांचे नेते आपल्या आंदोलनस्थळी येणार नाहीत असे समजू, पण हे आंदोलनाचे रणशिंग ताकदीने फुंकणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी यावेळी दिला.
...अन्यथा टोल नाक्यांवर पुन्हा धूर
लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झाल्या तरीही टोल काही हटला नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन टोलला कायमचे हटवावे, अन्यथा कोल्हापूरच्या जनतेशी बेईमानी केल्यासारखे होईल. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास नाक्यांवर पुन्हा धूर निघेल, असाही इशारा यावेळी बाबा इंदुलकर यांनी दिला.


महापौर निवडीशी संबंध नाही
१६ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौर निवड असल्याची माहिती काहींनी यावेळी डॉ. पाटील यांना दिली; पण याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यावेळी पक्षांचे नेते आपल्या आंदोलनस्थळी येणार नाहीत असे समजू, पण हे आंदोलनाचे रणशिंग ताकदीने फुंकणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी यावेळी दिला.
...अन्यथा टोल नाक्यांवर पुन्हा धूर
लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झाल्या तरीही टोल काही हटला नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन टोलला कायमचे हटवावे, अन्यथा कोल्हापूरच्या जनतेशी बेईमानी केल्यासारखे होईल. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास नाक्यांवर पुन्हा धूर निघेल, असाही इशारा यावेळी बाबा इंदुलकर यांनी दिला.

Web Title: The trumpet again on 16 November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.