सहा जिल्ह्यातील वकिलांनी फुंकले खंडपीठ आंदोलनाचे रणशिंग, राज्य सरकारला ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 11:37 AM2021-11-27T11:37:55+5:302021-11-27T12:50:52+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात असल्याने इतर कोणतेही नाव न घुसडता फक्त कोल्हापूरलाच खंडपीठ व्हावे असा ...
कोल्हापूर : कोल्हापूर खंडपीठाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात असल्याने इतर कोणतेही नाव न घुसडता फक्त कोल्हापूरलाच खंडपीठ व्हावे असा मंत्रिमंडळाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांकडे द्यावा आणि तोही ३१ डिसेंबरपूर्वी. अन्यथा १ जानेवारीपासून शासनाच्या नाकीनऊ येतील असे आंदोलन करू, असा इशारा देत सहा जिल्ह्यातील वकिलांनी शुक्रवारी कोल्हापुरातून खंडपीठ आंदोलनाचे रणशिंग नव्याने फुंकले.
कोल्हापूरला खंडपीठ व्हावे यासाठी गेली ३३ वर्षे आंदोलन सुरू आहे. आक्रमक आंदोलनामुळे मागणी टप्प्यात आली असतानाच कोरोना, लॉकडाऊनमुळे आंदोलन स्थगित करावे लागले. आता कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजीराव नलवडे होते. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेच्या जाहीर वाचनाने बैठकीची सुरुवात झाली. सर्वच वकिलांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना राज्य सरकारवरच दबाब टाकल्याशिवाय खंडपीठ पदरात पडणार नाही, मग एकत्रितपणे जो निर्णय घेतला जाईल तो पूर्ण ताकदीने तडीस नेऊ, असा निर्धार हात उंचावून केला. महाराष्ट्र गोवा बारकौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांनी खंडपीठाची आवश्यकता शाबित झाली असल्याने आता फक्त स्थापनेसाठी काय आणि कसे करायचे यावर लक्ष केंद्रीत करून आरपारचा लढा उभारण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
बैठकीत पंढरपूर बार असोसिएशनचे भगवानराव मुळे, व्ही. एस. गायकवाड, साताराचे वसंतराव भोसले, सिंधुदुर्गचे संग्राम देसाई, श्रीकांत जाधव, राजेंद्र रावराणे, संदीप लवटे, सुधीर चव्हाण, विजयकुमार ताटे देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना टोकाच्या लढ्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले.
सरकारला वेठीस धरा, खंडपीठ मिळवा
सरकारची इच्छाशक्ती असेल तर खंडपीठाचा प्रश्न लगेच सुटू शकतो हे सांगताना मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश तानाजीराव नलवडे यांनी ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना औरंगाबादला खंडपीठ करण्यासाठी मोठा विरोध असतानाही त्यांनी सरकार पणाला लावून हे खंडपीठ सुरू केले, तीच इच्छाशक्ती आताच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी यासाठी या सरकारलाच वेठीस धरा, असा कानमंत्र दिला. मी सेवेत असतानाही कोल्हापूर खंडपीठासाठी आग्रही होतो आणि ते मिळेपर्यंत सोबतच राहीन, असे असे सांगताना माझे नाव तानाजी आहे, मी गेलो तर गड जिंकून देऊनच जाईन अशी गर्जना केली.
राष्ट्रपतींची भेट घेणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबरला रायगड किल्ल्यावर येणार आहेत. खंडपीठाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी सहा जिल्ह्यांतील शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल असे ठरले आहे.
सतेज पाटील यांचे अभिनंदन
खंडपीठ आंदोलनात कायमच पुढे असलेले पालकमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल बैठकीच्या सुरुवातीलाच बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
बैठकीत आलेल्या सूचना
लोकन्यायालय कामकाजावर बहिष्कार टाकणे
जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढणे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणे
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेणे
मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांची भेट घेणे
सहा जिल्ह्यातील सर्व वकिलांचा एकत्रित मेळावा
चक्रीय उपोषणासह जेलभरो आंदोलन करणे