तृप्ती देसाई यांना मारहाण ही शरमेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:36 AM2016-04-16T00:36:57+5:302016-04-16T00:40:27+5:30
मेघा पानसरे यांचे मत : संबंधितांवर कारवाईची मागणी
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीचे दर्शन घेणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना असभ्य शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या प्रवृत्तींचा भारतीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हा अध्यक्ष मेघा पानसरे यांनी निषेध केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही फेडरेशनने केली आहे. जोतिबा फुले यांच्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतकातही मंदिरांत पुजाऱ्यांचा अंमल असावा व त्यांनी भाविक महिलांचा वापर करून एका स्त्रीला मंदिरात मारहाण करावी ही शरमेची बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,‘ स्त्रियांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नाकारला जाणार नाही याची हमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलिसांनी स्त्रियांना प्रवेश रोखणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून कारवाई केली पाहिजे, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. तृप्ती देसाई यांना सुरक्षितपणे गाभाऱ्यात नेणे ही प्रशासनाची जबाबदारी होती; परंतु त्यांनी दक्षता न घेतल्याने परिस्थिती चिघळली. कोण्याही सामान्य भाविक महिलेने गाभाऱ्यात जाण्याचे धाडस करू नये, याच उद्देशाने तथाकथित धर्म व संस्कृती रक्षकांनी कायदा हातात घेण्याचे कृत्य केले आहे.
महाराष्ट्र हिंदू प्लेसेस आॅफ पब्लिक वरशीप अॅक्ट १९५६ नुसार कोणीही हिंदू धर्मातील कोणत्याही वर्ग वा विभागाच्या व्यक्तीला हिंदूंच्या कोणत्याही सार्वजनिक पूजा व प्रार्थनास्थळी पूजा, प्रार्थना वा धार्मिक सेवा करण्यापासून रोखता येणार नाही, अडथळा आणता येणार नाही वा परावृत्त करता येणार नाही.
हा कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. स्त्रियांना प्रवेश रोखणे हा त्यांच्या नागरिक म्हणून असलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. शनिशिंगणापूरच्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने असल्याचे जाहीर केले आहे. मग या सर्व उद्रेकात ते का मौन बाळगून आहेत. ठाम भूमिका घेऊन प्रशासनाला ठोस कारवाईचे आदेश का देत नाहीत, हा खरा प्रश्न आहे.
स्वागतार्ह पाऊल
तृप्ती देसाई ह्या स्वत: धार्मिक हिंदू आहेत. त्यांनी धर्माअंतर्गत स्त्री-पुरुष समतेचे संविधानिक तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचलले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पोशाखाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे.