तृप्ती देसार्इंना मारहाण, रुग्णालयात दाखल

By admin | Published: April 14, 2016 12:21 AM2016-04-14T00:21:38+5:302016-04-14T11:29:35+5:30

अंबाबाई मंदिरातील घटना : अर्वाच्य शिवीगाळ, शंखध्वनी; पोलिसांवर आगपाखड

Trupti Desharei beat up, hospital | तृप्ती देसार्इंना मारहाण, रुग्णालयात दाखल

तृप्ती देसार्इंना मारहाण, रुग्णालयात दाखल

Next

कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटना व श्रीपूजकांचा तब्बल चार तासांचा कडवा विरोध झुगारून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चुडीदार परिधान करून अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन बुधवारी रात्री आठच्या सुमारास दर्शन घेतले; परंतु या घटनेनंतर गाभाऱ्यातून बाहेर पडताना श्रीपूजकांनी त्यांना बाहेर ढकलले व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रचंड मारहाण केली. यावेळी भाविक महिलांनी शंखध्वनी केला. पोलिसांनी त्यांना कडे करून मंदिराबाहेर आणले.

यावेळी देसाई यांना गाभाऱ्यात घेऊन जाण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतल्याचा आरोप करून पोलिस व जिल्हा प्रशासनावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते व भाविकांनी टीकेचा भडिमार केला. दरम्यान. रात्री उशिरा देसाई यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन प्रवेश करण्याची घोषणा तृप्ती देसाई यांनी केली होती. त्यांच्या या पवित्र्यावर प्रथम कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना व अंबाबाई देवीच्या भक्त महिलांनी विरोध केला. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल, या पोलीस प्रशासनाच्या आग्रहामुळे सर्व संघटनांनी प्रथम देसाई यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शनाला परवानगी दिली. यावेळी देसाई यांनी परंपरेनुसार साडी घालूनच दर्शन घ्यावे, असे सांगण्यात आले. त्यावर देसाई यांनी मी चुडीदार घालूनच देवीचे दर्शन घेणार, असे जाहीर केले.

त्यामुळे मंगळवारी याबद्दल हिंदुत्ववादी संघटना व शांतता समितीने विरोध करण्याचे ठरविले. बुधवारी त्या सायंकाळी पाच वाजता ताराराणी चौकात दाखल झाल्या. मात्र, त्यांना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या कारणावरून विजयी रॅली काढण्यास मनाई केली. दोन तास देसाई यांना ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात ठेवले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या दरम्यान भक्त महिलांनी देसाई यांना कोणत्याही परिस्थितीत देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करू द्यायचा नाही, असा निश्चिय केला. या महिलांनी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी देवीच्या पितळी उंबऱ्याजवळ प्रवेश करून ठिय्या मारला.

अन्य महिलांनी रांगेत उभे राहून जागा अडवून ठेवली. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी महिला व पुरुष कार्यकर्त्यांना पितळी उंूबऱ्यातून बाहेर जाण्याची प्रथम विनंती केली. मात्र, सर्वांनी ठिय्याच मारला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास कडवा विरोध करत कार्यकर्ते तेथेच ठिय्या मारून उभे राहिले. हा सुमारे तीनशेहून अधिक महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा जमाव होता. तो देसाई यांना गाभाऱ्यात जाण्यास रोखण्याच्या तयारीतच होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास देसाई यांना पोलिसांनी संरक्षणात मंदिर परिसरात आणले. मंदिरात त्यावेळी कमालीचा तणाव होता. परिस्थिती आणखी चिघळत चालली होती. त्यामुळे आतील विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा बळाचा वापर करत बाहेर काढण्याचा पोलिसांकडून जोरदार प्रयत्न झाला.

कार्यकर्त्यांनी वादावादी करत आम्हाला बाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणत विरोध केला. सायंकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी तृप्ती देसाई यांना पोलिस संरक्षणात पितळी उंबऱ्यातून मुख्य गाभाऱ्यासमोर आणण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी व देसाई यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न महिला कार्यकर्त्यांसह पुरुषांनी केला. हा कडवा प्रतिकार पोलिसांनी रोखत देसाई यांना देवीच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंत आणले. यावेळी पुन्हा श्रीपूजकांनी देवीच्या गाभाऱ्यात सोडण्याचा आमचा अधिकार असल्याचे सन १९५६ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये एक निकाल दिला आहे. त्याआधारे मंदिरातील धार्मिक परंपरा जपण्याचा अधिकार पुजाऱ्यांकडे असल्याचे श्रीपूजकांचे म्हणणे होते. या निकालाची प्रत श्रीपूजक केदार मुनीश्वर यांनी देसाई व पोलिस प्रशासनाकडे दिली.

यावेळी श्रीपूजकांनी देसाई यांना गाभारा प्रवेशापासून रोखून धरले. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात देसाई यांनी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न यावेळी केला. मात्र, श्रीपूजकांनी जोरदार विरोध केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार योगेश खरमाटे, पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, अमृत देशमुख यांनी श्रीपूजकांना देसाई यांना दर्शन द्यावे, अशी विनंती केली. मात्र, ही विनंती झुगारून श्रीपूजकांनी देसाई यांना अडवून ठेवले. सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी प्रांताधिकारी पाटील यांनी केदार मुनिश्वर यांना कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल, असे सांगत पोलिसांनी बळाचा वापर करत तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात अक्षरश: ढकलले.

देसाई यांनी आत जावून देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी गाभाऱ्याबाहेरील अर्वाच्य शिवीगाळ व प्रचंड घोषणाबाजी सुरु होती. अशा स्थितीत देसाई यांना कडे करुन गाभाऱ्यातून पोलिस संरक्षणातच बाहेर आणताना देसाई यांना महिला व पुरुष भक्तांकडून शिवीगाळ व केस उपडून जोरदार मारहाण झाली. या धक्काबुक्कीत अनेक महिला पडल्या तर काही महिला व पोलीस जखमी झाले.

देसाई यांना पोलिसांनी पळवतच गाडीपर्यंत नेले व गाडीत घालूनच अन्यत्र रवाना केले. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. तर देसाई समर्थकांनी भूमाता ब्रिगेडचा विजय असो, तृप्ती देसाई यांचा विजय असो अशा घोषणा केल्या. देसाई यांचे पाच-सहाच समर्थक होते तरीही त्यांनी तिथे घोषणा दिल्या.

सीसीटीव्ही फुटेज
पाहून कारवाई
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून धक्काबुक्की करणाऱ्या महिला व पुरुषांची ओळख पटविण्याचे काम गोपनीय यंत्रणा करीत आहे. ही नावे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

श्रीपूजकाने ढकलले अन् मारहाणीस सुरुवात
देसाई गाभाऱ्यासमोरील ओटी ठेवण्याच्या टेबलवर तब्बल अर्धा तास चक्क मांडी घालून बसल्या. मला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी प्रवेश द्या अशी हात जोडून विनंती केली; परंतु श्रीपूजक त्यास तयार नव्हते. त्याच दरम्यान प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी श्रीपूजकांना चर्चेसाठी बाहेर बोलविले. त्याचवेळी पोलिसांनी देसाई यांना गाभाऱ्यात ढकलले. ज्येष्ठ श्रीपूजकाने देसाई यांना बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीची पहिली ठिणगी तिथे पडली. त्यानंतर गाभाऱ्यातून बाहेर पडताना भाविक पुरुषांनी देसाई यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे व टोलविरोधी समितीचे कार्यकर्ते किसन कल्याणकर यांनी देसाई यांना मारहाण केली. पोलिसांदेखतच ते देसाई यांच्या अंगावर धावून जात होते.

Web Title: Trupti Desharei beat up, hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.