पोलिस महानिरीक्षकपदी विश्वास नांगरे-पाटील
By Admin | Published: June 25, 2016 12:41 AM2016-06-25T00:41:03+5:302016-06-25T00:41:19+5:30
तरुणांच्यात उत्सुकता
कोल्हापूर/मुंबई : येथील कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती झाली. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यावेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलिस अधिकारी होते.
नांगरे-पाटील यांची एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी पोलिस सेवेत बजाविलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन २०१३ मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांची अप्पर पोलिस महासंचालकपदी बढतीवर मुंबईला बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची प्रभारी नियुक्ती झाली होती. शुक्रवारी राज्यातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विश्वास नांगरे-पाटील हे सध्या औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी म्हणून कार्यरत होते. त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्राला चांगला अधिकारी मिळाला आहे. ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नांगरे-पाटील यांची ओळख
विश्वास नांगरे-पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी. ए. मधील सुवर्णपदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एमबीएची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी हॉटेल ताजमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षा कवच (बुलेटप्रुफ जॅकेट) नसतानाही ते गोळीबार सुरू असलेल्या ‘ताज’मध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना हॉटेल ताजच्या नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहिले. त्यांनी आतापर्यंत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस दल उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पश्चिम विभाग अप्पर पोलीस आयुक्त आदी पदांवर काम केले आहे.
तरुणांच्यात उत्सुकता
विश्वास नांगरे-पाटील यांची तरुण वर्गात क्रेझ आहे. स्पर्धा परीक्षेसाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे समजताच तरुणांच्यात उत्सुकता वाढली आहे.
गेल्या अठरा वर्षांपासून मी पोलिस प्रशासनात काम करीत आहे. आता मी माहेरी येत असून या ठिकाणी काम करण्यास वेगळा आनंद मिळेल.
- विश्वास नांगरे-पाटील,
विशेष पोलिस महानिरीक्षक