‘ओबीसी’ आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:45+5:302021-06-26T04:17:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून ...

The truth will come out if the OBC reservation white paper is issued | ‘ओबीसी’ आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल

‘ओबीसी’ आरक्षणाची श्वेतपत्रिका काढल्यास सत्य समोर येईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. जनगणनेचा अहवाल २०१४ पासून केंद्र सरकार देण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाचे भिजत घोंगडे पडले असून या प्रकरणात नेमके कोणाची चुक आहे, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवी, यासाठी ओबीसी आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण संबंधित मंत्र्यांकडे केल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही नारायण राणे समिती नेमली ती आमची चूक होती. त्यानंतर १०२ घटना दुरुस्तीनंतर मराठा आरक्षणाचा राज्याला अधिकार नसताना ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले, ही त्यांची चुकी होती. आता कोणाच्या चुका काढत बसण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोघांनी एकत्र आले पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा तर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच बट्ट्याबोळ झाला. मंत्री छगन भुजबळ यांनी परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत सगळा पर्दाफाश केला आहे. २०१० साली कृष्णमूर्तींच्या केसमध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल देण्यात आला. त्यानंतर २०११ ला जनगणना झाली आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे असून २०१४ पासून हा अहवाल भाजप देण्यास तयार नाही. हा अहवाल नसल्याने आरक्षणाचा पेच निर्माण झाला. वास्तविक मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे केले असते तर हा दिवस आला नसता. निति आयोग व जनगणना आयुक्त एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत, त्यामुळे एकदाची श्वेतपत्रिका काढावी, यामध्ये नेमके दोषी कोण आहेत, हे जनतेसमोर जाईल.

केंद्रीय तपास यंत्रणेबाबत आपण अनेक वेळा शंका व्यक्त केल्या आहेत. माजी पोलीस महासंचालकांनी एका वृत्तपत्रातील अग्रलेखातही सचिन वाझे व शर्मा हे कसे सेवेत आले, एकमेकांना कसे वाचवले, त्यांचे कारनाम्याबाबत उघड लिहिले आहे. अंबानीच्या घरासमोरील स्फोटके कोणी व कशासाठी ठेवली याचा लवकरात लवकर पर्दाफाश व्हायला हवा, अशी आपली मागणी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

फडणवीसांनी पुणे मनपातील वाझे शोधावेत

राज्य सरकारमधील प्रत्येक विभागात एक वाझे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केल्याबद्दल विचारले असता, कदाचित फडणवीस यांना पंचांगवाल्यांनी सांगितले होते की काय हे माहिती नाही, मात्र ते तीन आठवड्यांनी बोलले. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या पुणे महापालिकेत आंबिल ओढा येथील प्रकरण घडले. त्यामुळे फडणवीस यांनी अगोदर पुणे महापालिकेतील वाझे शोधावेत, मग इतर विभागाचकडे यावे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

पडळकर अर्ध्या हळकुंडानी पिवळे होणारे

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील टीकेबाबत विचारले असता, पडळकर हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: The truth will come out if the OBC reservation white paper is issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.