सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करा-प्रकाश आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:57 AM2017-10-20T00:57:11+5:302017-10-20T01:01:15+5:30
इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी आपण सरकारकडून प्रयत्न करावेत, अशी विनंती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी याबाबत शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बारामती येथे आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यावेळी वस्त्रोद्योगातील सद्य:परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. भाजप सत्तेवर आल्यापासून वस्त्रोद्योगातील सर्व योजना बंद केल्या आहेत. टफ्स योजनेंतर्गत मिळणारे अनुदान ३० टक्क्यांवरून १० टक्के केले आहे ते पूर्ववत करावे. इपीएफची सक्ती केली जात आहे. मात्र, शहरातील कारखानदारांचे एका शेडमध्ये वेगवेगळ्या मालकांचे यंत्रमाग असल्याने हा कायदा लागू होत नाही. त्यामुळे तो सरसकट लागू करू नये.
वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी विजेच्या दरात सवलत देऊन सर्व करासहीत प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज द्यावी. यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजामध्ये सात टक्के अनुदान द्यावे. कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली. प्रत्येक वेळी या शासनाकडून आश्वासने मिळाली आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही.
भविष्यात अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस राहिली तर हा उद्योग कोलमडून पडेल. त्यामुळे या उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मागण्यांची सोडवणूक करावी, अशी विनंतीकेली.शिष्टमंडळात सुनील पाटील, विलास गाताडे, सतीश कोष्टी, राहुल आवाडे, महेश पाटील, विश्वनाथ अग्रवाल, आदींचा समावेश होता.