मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:57+5:302020-12-25T04:20:57+5:30
सर्वच क्षेत्रात गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे; परंतु मुलींच्या जन्मदराबाबत आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे तालुक्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ...
सर्वच क्षेत्रात गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे; परंतु मुलींच्या जन्मदराबाबत आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे तालुक्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, अशी सूचना श्रीया कोणकेरी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.
सभापती रूपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शेजारच्या कर्नाटकात गर्भलिंग निदान चाचण्या होत असल्यामुळे तालुक्यातील मुलींचा जन्मदर खालावत आहे. त्याला पायबंद घालावा, अशी मागणी कोणकेरी यांनी केली.
कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही खासगी शाळांकडून शैक्षणिक शुल्काची वसुली सुरू आहे. ती थांबवावी, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली.
आदिती फौंडेशन व पंचायत समितीमार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी डिसेंबरअखेर अर्ज मागवावेत, अशी सूचना गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केली. तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी कार्यशाळा व समुपदेशनाचा उपक्रम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील सातही लघुपाटबंधारे तलावामध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता कमी असल्यामुळे उपसाबंदी लागू केलेली नाही. परंतु, भविष्यातील पाण्याची गरज विचारात घेऊन उपसाबंदीचे नियोजन करण्यात येईल, असे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले.
चर्चेत विजयराव पाटील, जयश्री तेली, बनश्री चौगुले यांनीही भाग घेतला. सभेला उपसभापती इराप्पा हसुरी यांच्यासह सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.