चोरीची कार नदीत टाकण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 11, 2017 06:30 PM2017-04-11T18:30:03+5:302017-04-11T18:30:03+5:30
कळे पोलिस ठाण्यात तक्रार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : पंचगंगा नदीघाटावर शिवाजी पुलाजवळ येथे अर्ध्या बुडालेल्या अवस्थेत तांबड्या रंगाची कार मंगळवारी सकाळी मिळाल्याने खळबळ उडाली. कारच्या नंबरवरून शोध घेतला असता ती अरुण पांडुरंग पाटील (रा. केर्ली, ता. करवीर) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सोमवारी रात्री कळे येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या दारातून कार चोरीला गेली होती. त्यानंतर चोरट्यांनी ती पंचगंगा नदीत टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी पूल, पंचगंगा नदीघाटावर नेहमी आंघोळीसाठी नागरिकांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास आंघोळ करून नदीपलीकडे असलेल्या पाटील महाराज समाधीमंदिरात दर्शन घेण्यासाठी काही नागरिक जात असताना त्यांना वडणगे गावच्या हद्दीतील पंचगंगा नदीपात्रात अर्ध्या बुडालेल्या अवस्थेत तांबड्या रंगाची कार (एम. एच. ०४ ए.पी. ३१९३) दिसून आली. घातपाताची शक्यता किंवा कार पाण्यात पडून काही विपरित घटना घडल्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविले.
काहीक्षणांतच करवीरचे पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर काढली. त्यावरील नंबरवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयात चौकशी केली असता ती अरुण पाटील यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना फोन करून पोलिसांनी बोलावून घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपले कळे येथे श्रीराम मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. येथून सोमवारी रात्री अकरानंतर कार चोरीला गेल्याचे मंगळवारी सकाळी लक्षात आले. दहाच्या सुमारास कळे पोलिस ठाण्यात यासंबंधी कच्ची तक्रार दिल्याचे सांगितले.
पूर्ववैमन्स्यातून कृत्य कळे येथून कार चोरून ती शिवाजी पूल, पंचगंगा घाटाच्या निर्जनस्थळी नदीत टाकण्याचा प्रयत्न झाल्याने अरुण पाटील यांच्यातील पूर्ववैमन्स्यातून हे कृत्य केले असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. यासंबंधी पोलिस त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. रंकाळा टॉवर ते शिवाजी पुलापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.