चिक्कोडी जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:21 AM2018-12-17T00:21:58+5:302018-12-17T00:22:02+5:30
निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी जिल्हा निर्मिती करणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्ह्यात १४ तालुके व १८ विधानसभा ...
निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडी जिल्हा निर्मिती करणे गरजेचे आहे. बेळगाव जिल्ह्यात १४ तालुके व १८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चिक्कोडी तालुका निर्मिती केल्यास विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे चिक्कोडी जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन आमदार शशिकला जोल्ले यांनी दिले.
निपाणी येथे रविवारी चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी चन्नमा सर्कल ते तहसील कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालय येथे रॅली आल्यानंतर ग्रेड टू तहसीलदार एम. एम. पाटील यांनी निवेदन स्वीकारले व सरकारदरबारी प्रश्न पोहोचवू, असे आश्वासन दिले. आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासूनची ही मागणी आता सरकारने पूर्ण करावी, यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून लढा देणार आहे. अनेक वर्षांपासून चिक्कोडी जिल्ह्याची मागणी होत आहे, पण सरकार याकडे दुर्लक्ष करत असून, आता लढा तीव्र करण्याची गरज आहे.
यावेळी हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगरसेवक जयवंत भाटले, बंडा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीवेळी हालशुगर उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक पप्पू पाटील, आर. एम. खोत, विश्वनाथ कमते, समित सासणे, चेतन स्वामी, गणपा गाडीवडर, पवन पाटील, निपाणी महिला मोर्चाचे अध्यक्ष विभावरी खांडके, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी आंदोलने सुरू असून आज, सोमवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेणार आहेत. यावेळी चिक्कोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष बी. आर. संगापगोळ व अन्य सदस्य हजर असणार आहेत. मुख्यमंत्र्यांना चिक्कोडी जिल्हा का केला पाहिजे, हे पटवून देणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.