महिलेवर बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 18, 2015 01:17 AM2015-05-18T01:17:38+5:302015-05-18T01:17:38+5:30

पतीलाही मारहाण : कोथळीतील तोतया पोलिसाला महिलेच्या नातेवाइकांकडून बेदम चोप

Trying to blackmail the woman by raping her | महिलेवर बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

महिलेवर बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

Next

कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर कोथळी (ता. करवीर) येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला पोलीस असल्याची बतावणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमास रविवारी दुपारी महिलेच्या नातेवाइकांनी बेदम चोप देत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित नंदकुमार दिनकर पाटील (वय ३७, रा. कोथळी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, पीरवाडी (ता. करवीर) येथील एक दाम्पत्य शुक्रवारी (दि. १५) कुरुकली येथे नातेवाइकांकडे निघाले होते. यावेळी महिला मोपेड, तर पती मोटारसायकल चालवीत होता. रात्री सव्वाआठच्या सुमारास ते दोघेजण कोथळी आणि हळदी गावांच्या पौंड नावाच्या शेताजवळील ओढ्यावर आले असता महिला लघुशंकेसाठी थांबली. यावेळी पती रस्त्यावरच गाडीवर बसून राहिला. त्याच ठिकाणी रस्त्याकडेला असलेल्या शेतामध्ये संशयित नंदकुमार पाटील त्याचे मित्र मच्छिंद्र व तानाजी असे तिघेजण उसाला पाणी पाजत होते. यावेळी त्यांना अंधारात दाम्पत्य दिसले. यावेळी पाटील हा महिलेचा हात पकडून तिला उसामध्ये घेऊन जाऊ लागला. भेदरलेल्या महिलेने आरडाओरड केली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण केली. त्याच्या मित्रांनी ‘तू असे काही करू नकोस. सोड, त्यांना जाऊ दे,’ असे सांगितले; परंतु त्याने त्यांनाही दमदाटी करीत पतीच्या समोरच महिलेवर उसाच्या शेतामध्ये नेऊन बलात्कार केला. सुमारे अर्ध्या तासाने महिलेला सोडून तो मित्रांसह निघून गेला. जाताना त्याने दोघांच्या गाड्यांचा नंबर घेतला होता. त्यानंतर भेदरलेले दाम्पत्य पुढे न जाता तिच्या माहेरी आले. भीतीपोटी दाम्पत्याने घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही.
दरम्यान, संशयित नंदकुमार पाटील याने शनिवारी महिलेच्या मोपेड गाडीच्या नंबरवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तिचा माहेरचा पत्ता शोधून काढून दुपारी तो मित्रासह तिच्या घरी गेला. यावेळी तिची आई एकटीच घरी होती. त्याने ‘मी करवीर पोलीस ठाण्यातून आलोय. तुमच्या मुलगीने गाडीचा अपघात केला आहे. त्याचे दीड हजार रुपये नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई देताय, की गुन्हा दाखल करू?’अशी धमकी त्यांना दिली. यावेळी भीतीने त्यांनी त्याला एक हजार रुपये दिले. पैसे घेऊन तो निघून गेला. त्यानंतर आईने मुलीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तिने पतीला हा प्रकार सांगिल्यानंतर त्यांनी त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. संशयिताचा मित्र मच्छिंद्र हा रंकाळा स्टँड येथून कोल्हापूर ते हळदी असे वडाप करतो.
एक-दोन वेळा वडापने प्रवास करताना तिने त्याला पाहिले होते. बलात्काराची घटना घडली त्यावेळी तोही त्याठिकाणी होता. त्यामुळे दाम्पत्याने नातेवाइकांना सोबत घेऊन त्याला रंकाळा स्टॅँड येथे गाठले. त्याला विचारणा केली असता त्याने नंदकुमार पाटील याचे नाव सांगितले.
पाटील हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून जमीन व्यवहारासंबंधी चर्चा करायची आहे, अशी बतावणी करून त्याला बोलावून घेतले.
दुपारी दीडच्या सुमारास तो रंकाळा बसस्थानकावर येताच महिलेच्या नातेवाइकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. बेदम चोप देत त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. (प्रतिनिधी)
 

Web Title: Trying to blackmail the woman by raping her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.