‘नूल’ भयमुक्त करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:06+5:302021-05-26T04:24:06+5:30
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी (२४) अखेर ४८ पर्यंत पोहोचली आहे. मात्र, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य ...
नूल :
नूल (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी (२४) अखेर ४८ पर्यंत पोहोचली आहे. मात्र, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक डॉक्टरांचे पथक, आशा, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मृत्यूसंख्या केवळ दोनपर्यंत रोखण्यात यश आले आहे. दोन मृत्यूंपैकी एक महिला असून, ती नांदेडहून आलेली होती.
योग्यवेळी निदान व उपचार केल्यास कोरोना बरा होतो. सध्या संशयित रुग्णांचे विलगीकरण होत नसल्याने समूह संसर्ग वाढत आहे. याला पायबंद घालण्यासाठी गावाने दक्षता समिती ताबडतोब कार्यरत केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल नेवडे तसेच स्थानिक विजय शहा, स्वप्निल चव्हाण, दिलीप मांजरेकर, स्वप्निल शिंदे, संजीवनी मांजरेकर, अश्विनी शिंदे, मनीषा जगदाळे या आठ डॉक्टरांनी चोवीस तास सेवा सुरू ठेवली आहे.
गावातील दूध संस्थांनीदेखील ऑक्सिजन व ताप मोजण्याची यंत्रणा सुरू केली आहे. आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात ठेवण्यात गावाला यश आल्याची माहिती प्रशासन अधिकारी अमृतराव देसाई, सरपंच प्रियांका जाधव, उपसरपंच प्रवीण शिंदे यांनी दिली.
-----------------------
फोटो ओळी : नूल (ता. गडहिंग्लज) येथील विविध दूध संस्थांकडून नागरिकांची ऑक्सिजन व ताप तपासणी करूनच दूध खरेदी-विक्री केली जात आहे.
क्रमांक : २५०५२०२१-गड-०७