मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील; पालकमंत्री सतेज पाटील : डीजीसीएसोबत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:44 AM2021-02-28T04:44:39+5:302021-02-28T04:44:39+5:30
कोल्हापूर : गेले अनेक महिने बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सकाळी सुरू करण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुंबईतील विविध ॲथॉरिटींशी ...
कोल्हापूर : गेले अनेक महिने बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सकाळी सुरू करण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुंबईतील विविध ॲथॉरिटींशी मी सातत्याने बोलत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी सांगितले. नाईट लँडिंगसंदर्भातील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी डीजीसीएसोबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवार, बुधवार, गुरुवारी सकाळी विमानसेवा सुरू होईल, असे प्रयत्न आहेत. त्याशिवाय आणखी विमानांचे येथून उड्डाण व्हावे, याकरिता प्रयत्नशील आहे. नाईट लँडिंगमध्ये कळंबा पाॅवरग्रीडचा मोठा अडथळा आहे. विमान उतरताना वैमानिकास त्याचा अंदाज येत नाही, ही मोठी अडचण आहे. दुसऱ्या बाजूला गडमुडशिंगीच्या बाजूनेही विमाने उतरू शकतात. मात्र, तेथील एमएसईबीची ट्रान्समीशन लाईन आहे. ती दुसरीकडे नेण्यासाठी १८ कोटींची गरज आहे. त्याचीही तरतूद केली आहे. आतापर्यंत २ लाख १३ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे.
ते म्हणाले, डीजीसीएने नाईट लँडिंगमध्ये आलेले अडथळे काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत काही अडथळे काढले असून काही काढणेच अशक्य आहे. त्यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांना दिल्लीत पुढील आठवड्यात डीजीसीएबरोबर बैठक बोलाविण्याची विनंती केली आहे. त्याकरिता मीही उपस्थित राहणार आहे. सगळ्यांच्या प्रयत्नातून विमानतळाचा विकास होत असेल तर ते चांगलेच आहे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.