स्टंट करण्याचा मोह पर्यटकाच्या अंगाशी

By admin | Published: April 13, 2017 11:00 PM2017-04-13T23:00:09+5:302017-04-13T23:00:09+5:30

रिक्षाचालकाने वाचविले बुडणाऱ्या तरुणाला, गुहागर तालुक्यातील हेदवी येथील प्रकार

Trying to stun someone with an entourage | स्टंट करण्याचा मोह पर्यटकाच्या अंगाशी

स्टंट करण्याचा मोह पर्यटकाच्या अंगाशी

Next



गुहागर : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशाच प्रकारचा थरारक प्रसंग गुहागर तालुक्यातील हेदवी येथे पर्यटकांनी अनुभवला. हेदवी समुद्रकिनाऱ्यावरील बामणघळ येथे थरारक स्टंट करण्याचा मोह कऱ्हाड येथील एका तरुण पर्यटकाच्या अंगाशी आला. तो या घळीमध्ये पडला. गुहागर शहरातील रिक्षाचालक निरंकार गोयथळे व पर्यटकांनी मिळून केलेल्या प्रयत्नानंतर या पर्यटकाला वाचविण्यात यश आले.
तालुक्यातील हेदवी येथील दशभूज गणेश प्रख्यात आहे. येथील मनमोहक
समुद्र किनाऱ्याबरोबरच निसर्गाचं देणं लाभलेल्या बामणघळीचे भरतीवेळी उडणाऱ्या तुषारांचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. दोन खडकांमध्ये वर्षानुवर्षे भरतीवेळी लाटांच्या माऱ्यामुळे पडलेल्या तब्बल ५० फुटापर्यंत दगडामध्ये मोठी चीर पडली आहे. यालाच बामणघळ असे नाव पडले आहे.
मंगळवारी कऱ्हाड येथील १० ते १२ तरुण मौजमजा करण्यासाठी हेदवी येथे आले होते. बामणघळ येथील लाटांचा नजारा पाहताना या घळीवरून पलीकडे जाण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि यातूनच पप्पू नावाचा एक तरुण घळीमध्ये पडला व येथूनच जीवघेणा खेळ सुरू झाला.
यावेळी गुहागर खालचा पाट येथील बिनधास्त रिक्षाचालक निरंकार (बावा) नामदेव गोयथळे हा कल्याण (मुंबई) येथील सागर दिवेकर, त्याची पत्नी मानसी यांना घेऊन या ठिकाणी आला होता. घळीमध्ये युवक पडल्याचे समजल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथम पायाचा आधार देऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तोही खेचला जात होता. हे पाहून रिक्षाचालक निरंकारने त्याला धरून ठेवले व एका हाताने पडलेल्या युवकाला हात देण्याचा प्रयत्न सुरू केला. सागर दिवेकर यांचा निरंकारला हात देऊन साखळीपद्धतीने पप्पूला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. बाहेर येतायेताच पप्पू पुन्हा पाण्यात पडल्याचा प्रकार दोन-तीनवेळा घडला. त्यातच दोन वेळा मोठी लाट आल्यामुळे पप्पूचा आधार सुटला. त्यामुळे खडकावर उभ्या असलेल्या साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पण पाण्यात पडलेल्या पप्पूला पोहता येत असल्याने मोठ्या लाटा येऊनही तो बुडाला नाही.
यावेळी निरंकारने तेथे फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेकडून तिची ओढणी मागून घेतली आणि ती पाण्यामध्ये टाकली. त्या आधारे पप्पू पाण्यातून बाहेर आला आणि त्याला जीवदान मिळाले. (प्रतिनिधी)
घटनेचे देवदर्शनासाठी आलेल्यांकडून चित्रीकरण
गुहागरमध्ये व्याडेश्वर कुलदैवताला भेट देण्यासाठी आलेल्या प्रसाद ग्रामोपाध्ये, पत्नी व दोन मुले यांनी हा सर्व प्रकार पाहताना त्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे हा सर्व प्रकार चर्चेत आला. ‘लोकमत’च्या आॅनलाईन वेबसाईटवरही हा व्हिडिओ प्रकाशित झाला आहे.
रिक्षाचालक निरंकार गोयथळे हा बावा नावानेच गुहागरमध्ये सर्वांना परिचित आहे. लहानपणापासून बिनधास्त स्वभावाचा म्हणून ओळख आहे. पट्टीचा पोहणारा अशी ख्याती असून गुहागर तळ्यामध्ये त्याने एकाचा यापूर्वीही जीव वाचविला आहे. सर्व स्तरांतून या धाडसाबद्दल निरंकारचे कौतुक होत आहे.

Web Title: Trying to stun someone with an entourage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.