विधानपरिषदेसाठी सांगलीतून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न

By admin | Published: October 26, 2016 11:40 PM2016-10-26T23:40:30+5:302016-10-26T23:40:30+5:30

काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण : विशाल पाटील गटाचा पुढाकार; सांगलीत ४८ सदस्यांची बैठकीला हजेरी

Trying for Third Front from Sangli for Legislative Council | विधानपरिषदेसाठी सांगलीतून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न

विधानपरिषदेसाठी सांगलीतून तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न

Next

सांगली : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले असतानाच, आता तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसमधीलच विशाल पाटील गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन बुधवारी सांगलीत बैठक घेतली. यामध्ये महापालिकेचे ३0, जत नगरपरिषदेचे १२, पंचायत समितीचे ३ आणि जिल्हा परिषदेचे ३ अशा एकूण ४८ सदस्यांनी हजेरी लावली होती.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन्ही काँग्रेस एकमेकांविरोधात लढण्यासाठी सज्ज झाले असतानाच, काँग्रेसअंतर्गत महापालिकेत कार्यरत विशाल पाटील गटाने बंडखोरीचा मोठा फटाका फोडला आहे. सांगलीतील काँग्रेस भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका खासगी सभागृहात ही बैठक झाली. महापालिकेतील स्वाभिमानी आघाडी, राष्ट्रवादी, तसेच शेखर माने यांच्यासह त्यांच्या गटातील काही नगरसेवक यात सहभागी झाले होते. जत नगरपरिषद, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह जवळपास ४८ सदस्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. याच गटाची बैठक गुरुवारी कऱ्हाडमध्ये होणार आहे. त्याठिकाणच्या काँग्रेस व अन्य पक्षांतील नाराज नगरसेवकांना एकत्रित केले जाणार आहे. नाराजांची संख्या शंभरावर जाईल, असा अंदाज या गटाने बांधला आहे. भाजप, शिवसेना व अपक्ष सदस्यांनाही एकत्रित आणण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.
या बैठकीत पक्षीय नेत्यांकडून सदस्यांना कोणत्याही गोष्टीसाठी गृहीत धरले जाण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. निवडून आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांच्या सदस्यांच्या प्रश्नांकडे निवडून आलेले आमदार लक्ष देत नाहीत. त्यामुळे पक्षाचे नेते म्हणतील ती पूर्व दिशा, हे आता चालणार नाही, असा इशारा काही सदस्यांनी यावेळी दिला.
काँग्रेसअंतर्गतच एक गट बंडखोरीचे निशाण फडकवू लागल्यामुळे, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)


नेते एकीकडे, गट दुसरीकडे...
गेल्या काही दिवसांपासून वसंतदादांचा गट मोहनराव कदम यांच्या उमेदवारीसाठी कार्यरत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी विशाल पाटीलही उपस्थित होते. त्यावेळी मोहनराव कदम यांच्या उमेदवारीची शिफारस सर्वानुमते करण्यात आली होती. काँग्रेस एकसंध आहे, असे वाटत असतानाच, महापालिकेतील विशाल पाटील यांना मानणाऱ्या सदस्यांनी तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली सुरू केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत.

बैठकीबाबत गोपनीयता
सांगलीत पार पडलेल्या नगरसेवकांच्या या बैठकीबाबत सर्वांनीच कमालीची गोपनीयता बाळगली होती. तरीही ही गोष्ट राजकीय वर्तुळात पसरली. विशाल पाटील यांच्या गटातील नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे या विषयाची चर्चा रंगली होती.


उमेदवारीची मागणी
काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांनी काँग्रेसकडे अधिकृत उमेदवारीची मागणी करणार असल्याचे सांगितले. गुरुवारी यासंदर्भात ते पक्षाकडे प्रस्ताव देणार आहेत. पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.

Web Title: Trying for Third Front from Sangli for Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.