तू-तू, मैं-मैं झालं अन् साहेबच गेले रजेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:59+5:302021-03-19T04:22:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वर्षभरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्याची वेळ आली. उद्या तपासणीचा मुख्य दिवस. वरिष्ठांचा कागदावर अंतिम शेरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वर्षभरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्याची वेळ आली. उद्या तपासणीचा मुख्य दिवस. वरिष्ठांचा कागदावर अंतिम शेरा उमटणार होता, तोच प्रभारी पोलीस अधिकारी व वरिष्ठांच्यात ‘वाजले.’ तू-तू, मैं-मैं झाले अन् प्रभारी अधिकाऱ्याने चक्क रजाच टाकली ! तपासणीच रखडली. शहरातील एका पोलीस ठाण्यात घडलंय हे नाट्य; पण चर्चा रंगलीय साऱ्या पोलीस दलात. मुंबई स्टाईलवर वागणाऱ्या ‘पाषाण’हृदयी प्रभारी अधिकाऱ्याचा ‘रुबाब दिखाव्याचा, कर्तृत्व मात्र घसरतीचे असे म्हणण्याची वेळ आली.
वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा, क्राईम रेट, प्रलंबित गुन्हे, तक्रार अर्जांची निर्गत, आदींचे मूल्यमापन म्हणजेच वार्षिक तपासणी होय. गेल्या आठवडाभरात प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीचे मूल्यांकन सुरू झाले. मूल्यांकनावरच त्या-त्या प्रभारी अधिकाऱ्यांचे कर्तृत्व उजाळते. त्याचप्रमाणे ही वार्षिक तपासणी सुरू झाली. वरिष्ठांच्या कार्यालयातील लिपिकांनी मुख्य तपासणीपूर्वी जाऊन अगोदरचे चार दिवस प्रलंबित गुन्ह्यांचा, मुद्देमालाचा प्राथमिक आढावा घेतला. ‘शाहू’नगरीतील या हॉट पोलीस ठाण्यात प्राथमिक तपासणीला वेग आला. येथे प्रलंबित गुन्ह्याचे, प्रलंबित तक्रार अर्जांचे प्रमाण मोठे आढळले. मुख्य तपासणीपूर्वीच ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या प्रभारींना याचा जाब विचारला. त्यावरून वरिष्ठांसोबत प्रभारींची चांगलीच जुंपली. सर्वांसमक्ष तू-तू, मैं-मैं झाले. वाद विकाेपाला गेला. उद्यापासून मुख्य तपासणीचा होणारा श्रीगणेशा वादामुळे राहूनच गेला. नव्हे, प्रकृतीचे कारण पुढे करीत प्रभारींनी धूम ठोकली व चक्क काही दिवसांची दांडीच मारली. अखेर तपासणी पुढे ढकलली; पण ‘अर्थपूर्ण’ घडामोडींवरून हा वाद झाल्याची पोलिसांत दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
रात्री आठनंतर काम बंद !
खाकीची सेवा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे; पण या प्रभारी साहेबांना म्हणे, रात्री आठनंतर कोणी काहीही काम सांगायचे नाही, कोणीही फोन करायचा नाही, पोलीस ठाण्यामधून तर नाहीच नाही... ! ‘याचा माझ्याशी काय संबंध? मला कशाला विचारता?’ अशा पद्धतीने त्यांची वाणी चालते. त्यामुळे रात्री उशिरा या पोलीस ठाण्यात महत्त्वाची नवी नोंद वाढतच नाही, हेच विशेष. ही सवय तेथील पोलिसांच्याही अंगवळणी पडलीय.
मीटिंगला बाहेर ठेवले ताटकळत
प्रभारींची कार्यपद्धती वरिष्ठांच्याही कानांवर पोहोचली. कामाची स्टाईल बदलत नसल्याने त्यांना गेल्याच आठवड्यात वरिष्ठांनी मीटिंगवेळी चक्क दरवाजाबाहेर उभे केल्याचीही चर्चा पोलिसांत आहे.