क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियानाचा कळंबा कारागृहातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 11:15 AM2020-12-02T11:15:27+5:302020-12-02T11:17:56+5:30
Health, jail, kolhapur, CPR Hospital क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी झाला.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्षय व कुष्ठरुग्ण शोध सर्व्हेक्षण अभियान २०२०चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांनी क्षय व कुष्ठ सर्व्हेक्षणात लक्षणे न लपवता सर्वांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी झाला.
क्षयरोगाची लक्षणे दिसली तर लपवू नका. एकदा वेळ निघून गेली तर सहा महिन्यांऐवजी दोन वर्षांची (एम.डी. आर. टी.बी.) औषधे घ्यावी लागतील, असाही इशारा मित्तल यांनी दिला. सर्वेक्षणात लक्षणांनुसार तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी मार्गदर्शन केले. १४ दिवसांच्या सर्व्हेक्षणात घरातील सर्वांची तपासणी होणार आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. महेंद्र फाळके, डॉ. पी. ए. पटेल, डॉ. मानसी कदम, डॉ. विनायक भोई, विनोद नायडू, विशाल मिरजकर, धनाजी परीट, आदी मान्यवर व बंदीजन उपस्थित होते.