‘सीपीआर’मध्ये क्षयरोगाचे बनावट दाखले

By admin | Published: May 17, 2016 11:57 PM2016-05-17T23:57:38+5:302016-05-18T00:25:11+5:30

रॅकेट कार्यरत : प्रशासनातील काहींचा सहभाग; एसटीचे काही कर्मचारीही सामील; मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज

Tuberculosis tests in CPR | ‘सीपीआर’मध्ये क्षयरोगाचे बनावट दाखले

‘सीपीआर’मध्ये क्षयरोगाचे बनावट दाखले

Next


कोल्हापूर : सीपीआरमध्ये ३० ते ५० हजार रुपये घेऊन टी. बी. (क्षयरोग) बाधित बनावट दाखले देणारे रॅकेट कार्यरत असून याद्वारे राज्य परिवहन मंडळातील काहींनी एक वर्ष बसून पगार खाल्ला आहे, तर काहीजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या रॅकेटमध्ये सीपीआर प्रशासनातील कर्मचाऱ्यांबरोबरच परिवहन मंडळातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाबाबत मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले.
राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण २० कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये या रॅकेटला देऊन क्षयरोग झाल्याबाबतची बनावट प्रमाणपत्रे घेतल्याची शंका आहे. या बनावटगिरीला सीपीआरमधील काही कर्मचारी तसेच परिवहन मंडळातील तथाकथित काही नेत्यांची साथ असल्याचे समजते. मात्र, या प्रकरणात सीपीआर प्रशासन मुळाशी जाऊन याचा शोध घेत नसल्याचा जाब पवार यांनी डॉ. पाटील यांना विचारला. दरम्यान, गतमहिन्यात लक्ष्मीपुरी पोलिसांत बनावट क्षयरोग दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास कुठंपर्यंत गेला आहे, अशी विचारणा संजय पवार यांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली. त्यावर तपास अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलावून घ्यावे, अशीही मागणी केली.
थोड्या वेळाने तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनीषा गबाले याठिकाणी आल्या. त्यांनी या प्रकरणात चार संशयित आरोपी आहेत. त्यापैकी तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मी एक महिना प्रशिक्षणाला गेल्यामुळे हा तपास झाला नव्हता. आता त्यातील मुख्य सूत्रधाराच्या लवकरच मुसक्या आवळू, असे सांगून तपासासाठी सीपीआर प्रशासनाने प्रमाणपत्रांवर जे शिक्के आहेत, त्या शिक्क्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना शिक्के उपलब्ध करून दिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
हे ऐकून शिष्टमंडळाने डॉ. पाटील यांना धारेवर धरले. पोलिसांना तपासकामी शिक्के उपलब्ध करून द्यावेत, नाही तर त्यांना आताच सहआरोपी करावे, अशी मागणी करून बनावट क्षयरोग दाखला प्रकरणी निष्क्रिय अधिकाऱ्यांना शोधून काढून कारवाई करावी, अशी मागणी केली.
शिष्टमंडळात शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, संदीप पाटील, रणजित आयरेकर, हर्षल पाटील, दिलीप देसाई, विकास नेसरीकर, शैलेश पुणेकर, शुभांगी साळोखे, पूजा सोहनी, दीपाली शिंदे, सुमन शिंदे, कमलताई पाटील, रेहाना खान आदींचा सहभाग होता.


प्रकरणाची व्याप्ती मोठी
बनावट क्षयरोग प्रमाणपत्राची व्याप्ती मोठी असून सीपीआरमध्ये रोज वावरणारा एक एजंट याचा सूत्रधार असल्याचे समजते. त्याला सीपीआरमधील कर्मचाऱ्यांची साथ असून परिवहन मंडळातील काही तथाकथित नेत्यांनी सावज हेरुन या साखळीत अडकविल्याचे समजते. यापैकी काहीजणांनी या प्रमाणपत्राचा लाभ घेतला असून काहीजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना पकडणे गरजेचे आहे.


बनावट क्षयरोग दाखल्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सातपैकी सहा जणांनी अशाप्रकारचे दाखले घेतल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याच्या मुळाशी जाऊन तपास करू.
- डॉ. एल. एस. पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर

 

Web Title: Tuberculosis tests in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.