‘बिद्री’ च्या सत्तेचा मंगळवारी फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 06:09 PM2017-10-09T18:09:17+5:302017-10-09T18:10:53+5:30
बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
‘बिद्री’साठी रविवारी अत्यंत चुरशीने विविध गटांतील ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदारांनी मतदान केले. संस्था गट वगळता सर्वाधिक मतदान गट क्रमांक तीन कागलमध्ये ८५.६४ टक्के मतदान झाले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी विकास आघाडी व आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक व दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास’ आघाडी यांच्यात सरळ लढत झाली.
दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मोजणी १८७ टेबलांवर होणार असून, पहिल्यांदा संस्था गटाची मोजणी प्रक्रिया होणार आहे.
साधारणत: दुपारी तीन वाजता संस्था गटाचा निकाल अपेक्षित आहे. गत निवडणुकीच्या मतमोजणीत झालेला विलंब व वाढलेले मतदान यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी जादा टेबलांची मांडणी केली आहे. यासाठी ३७४ कर्मचाºयांची नेमणूक केली असून, शंभर कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
मतपत्रिकेच्या वर्गीकरणाची प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी एकनंतरच गटनिहाय मतमोजणीस सुरुवात होईल. त्यामुळे साधारणत: बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.
निकालाबाबत कमालीची उत्सुकता!
‘बिद्री’चे कार्यक्षेत्र चार तालुक्यांत असले तरी निवडणुकीबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. रविवारी मतदान झाल्याने सोमवारी सकाळपासूनच निकालाची चौकशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली जात होती.