वसुलीचा तगादा बेततोय बळिराजाच्या जिवावर
By admin | Published: March 27, 2016 10:27 PM2016-03-27T22:27:45+5:302016-03-28T00:20:15+5:30
ग्रामीण भागात सावकारकी जोमात : अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर
गणपती कोळी -- कुरुंदवाड --सावकाराच्या वसुलीच्या तगाद्याने शिरढोण (ता़ शिरोळ) येथील प्रकाश रामू कोरे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली़ यातून ग्रामीण भागातील वास्तव स्पष्ट होत आहे़ दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी वाळत असलेले उभे पीक, घसरलेला उसाचा दर, यातून सोसायटी, बँकेची कर्जे फिटण्याची शक्यता नाही़ अशातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील खासगी सावकाराचा फास आवळत आहे़ त्यामुळे यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे़
बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, उत्पादित मालाला मिळणारी बाजारपेठ त्यामुळे येथील शेतकऱ्यांची उलाढालही मोठी असते़ मुख्य पीक ऊस असले तरी भाजीपाला, कडधान्ये, फळभाजी पिकविण्यात येथील शेतकरी माहीर आहेत़ ऊस पिकाला सेवा सोसायटी, बँकांतून कर्ज दिले जाते़ सोसायटीकडून एकरी ३५ ते ४० हजार रुपये, तर बँकेकडून ६० हजार रुपये कर्ज दिले जाते़ उत्पादन खर्च, मजुरी यासह इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्याचा कर्जरूपात मिळणाऱ्या पैशांवर खर्च भागत नाही़
पिकांचे उत्पादन जादा घेऊन जास्त आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची शेतीसाठी लागेल तो खर्च करण्याची तयारी असते़ उत्पादन आल्यावर सर्वच देणी भागविण्यात येईल, या आशेवर खर्चाची उलाढाल करण्यासाठी खासगी सावकाराचा आधार घेतला जातो़ ग्रामीण, शहरी भागात राजरोजसपणे सावकारकी चालू आहे़ शेतकऱ्यांची अडचण पाहून व्याजाचा दर आकारला जातो़ यामध्ये पाच, दहा, पंधरा टक्क्यांपर्यंत व्याजाचा दर असतो़ शेतीचा खर्च व संसाराचा गाडा चालविण्यासाठी आगतिक झालेल्या शेतकऱ्याला सावकारकीचे पाय धरावे लागत आहेत.
शेतकऱ्याकडे मासिक व्याज देण्याची व्यवस्थाच नसल्याने त्याचाच गैरफायदा घेत सावकार व्याजावर व्याज लावून चक्रवाढ व्याजाप्रमाणे वर्षाअखेर त्याची रक्कम वसूल करतो़
यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे हा शेतकरी अडचणीत आला आहे़ पाऊसच नसल्याने विशेषत: ऊस पिकाची वाढ झाली नाही़ त्यामुळे एकरी उताऱ्यात कमालीची घट आलेली आहे़ पीक उत्पादन खर्चात वाढ झाली असताना यंदा उसाचा दरही घसरला आहे़ या एकूणच दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी, बँकांचे घेतलेले कर्जही फिटेना़ त्यामुळे बँकेने मार्चअखेर खाती ‘निल’ करण्यासाठी तगादा लावला आहे़
कर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचेच पैसे फिटत नसल्यामुळे आपले पैसे कधी मिळणार म्हणून खासगी सावकार कर्जदारांच्या पाठी लागला आहे़ या वसुलीच्या तगाद्याने कर्जदार शेतकरी संकटातून शॉर्टकट मार्ग काढण्यासाठी विषाचा प्रयोग करीत आहेत. यातूनच बिनबोभाट चालू असलेली ग्रामीण भागातील खासगी सावकारकी चव्हाट्यावर आली असून, शेतकऱ्यांवर सावकारीचा फास आवळत आहे़
घेतलेले कर्ज परत करणे गरजेचे आहे़ मात्र, व्याजाची आकारणी, परिस्थिती याचे भानही सावकराने राखणे तितकेच आवश्यक आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर एकदा निर्णय घेण्याऐवजी सावकारांवर अंकुश ठेवून सावकारांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे़