आयटीआयचे विद्यावेतन ४० वरून ५०० रुपयांवर, तब्बल ४० वर्षानंतर झाली वाढ
By पोपट केशव पवार | Published: September 19, 2023 05:02 PM2023-09-19T17:02:33+5:302023-09-19T17:02:51+5:30
प्रशिक्षणार्थींना मासिक खर्चाला हातभार
पोपट पवार
कोल्हापूर : एकीकडे तीन-चार वर्षात नवी वेतनवाढ मिळाली नाही तर रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या उदंड झाली असताना दुसरीकडे मात्र, तब्बल ४० वर्षानंतर विद्यावेतनात वाढ झाल्याचा अनुभव शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांच्या वाट्याला आला आहे.
विशेष म्हणजे ४० रुपयांचे तुटपुंजे विद्यावेतन थेट ५०० रुपये केल्याने निदान मासिक खर्चाला तरी ही रक्कम हातभार लावेल अशी भावना प्रशिक्षणार्थ्यांची झाली आहे. राज्यात शासकीय आयटीआयच्या कॉलेजची संख्या ४१८ असून प्रशिक्षणार्थींची संख्या सुमारे लाखभर आहे. त्यांना याचा लाभ होऊ शकेल.
शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक खर्चासाठी देण्यात येत होते. या विद्यावेतनात कोणतीच वाढ करण्यात आली नव्हती. एकीकडे वाढती महागाई, शैक्षणिक साहित्यामध्ये वारंवार होणारी दरवाढ यामुळे या विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी प्रशिक्षणार्थी करत होते. मात्र, या मागणीला गेल्या ४० वर्षांपासून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
अखेर १७ ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ४० रुपयांचे विद्यावेतन ५०० रुपये करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. यामुळे गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
शासकीय आयटीआयमधील एकून विद्यार्थी क्षमतेच्या निम्म्या विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १२ शासकीय आयटीआयची कॉलेज असून यामध्ये ३,२३१ हून विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामुळे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागार्स, भटक्या मागास, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास वर्गातील विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन मिळेल. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढल्याने गरीब, गरजू विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होईल. त्यांचा मासिक खर्च भागविण्यासाठी ही रक्कम त्यांना उपयोगी पडेल. मात्र, विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. - महेश आवटे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा, कोल्हापूर.