तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:44 PM2019-07-09T23:44:34+5:302019-07-09T23:44:39+5:30
इंद्रजित देशमुख वारकरी संप्रदाय हा लोभस आणि प्रेयस या दोन्हींचे संतुलन ठेवून कार्य करत आहे. आजचे आमचे जीवन प्रेयसाने ...
इंद्रजित देशमुख
वारकरी संप्रदाय हा लोभस आणि प्रेयस या दोन्हींचे संतुलन ठेवून कार्य करत आहे. आजचे आमचे जीवन प्रेयसाने व्यापले आहे. आजच्या गतिमान युगामध्ये ‘खा, प्या आणि मजा करा’ या सूत्रावरच भर दिला आहे. सध्याचे अनेक अर्थशास्त्रज्ञ आता असे विचारत आहेत की, तुमच्या देशाचे उत्पन्न काय; आहे सांगू नका. तुमच्या देशातील सर्व गरजा भागून तुम्ही सर्व समाधानी आहात काय ? हे विचारत आहेत. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने मानवाच्या भौतिक जीवनात सर्व बाजूंनी भरपूर संपन्नता आणली आहे. या संपन्नतेमुळे त्याचा कौटुंबीक, सामाजिक जीवनामध्ये अहंकार दुणावला आहे. निसर्गावर मात करून या पुरुषार्थाच्या जोरावर तो सुख मिळवत आहे म्हणजेच प्रेयसाच्या प्राप्तीचा भरपूर आनंद मिळवत आहे. पण, यामध्ये झालेली एकसुरी वाढ, चंगळवाद यामुळे माणसाचे जीवन हे पोकळ झाले आहे. तो आतून संकुचित, अस्थिर आणि अस्वस्थ आहे. आपल्या पुरुषार्थाने बाहेरच्या अनेक गोष्टींवर प्रभूत्व मिळविल्याचे तो मिरवत असला तरीही अंतरंगात तो वासना आणि विकारांचा गुलामच झाला आहे.
वारकरी सांप्रदायातील तत्त्वज्ञान या अवस्थेतून बाहेर पडण्याची प्रेरणा देत प्रेयसाला नकार न देता धैर्य, करूणा, प्रेम, ज्ञान, न्याय, सहानुभूती, सदिच्छा, आत्मियता, सत्यम् शिवम् सुंदरम् जीवनाची जीवनमूल्ये रूजविण्याचे कार्य करत आहे. या जीवनमूल्याच्या अधिष्ठानावर मृत्युंजयी अशी जीवननिष्ठा तयार करण्याचे कार्य हा भागवत धर्म करत आहे. विशुद्ध ज्ञान, शांती आणि आनंद या श्रेयसाची प्रतिष्ठापना करण्यासाठीच हा भागवत धर्म सरसावलेला आहे.
जरी ऐच्छिक उन्नतीला विरोध नसला तरी स्वत:च्या पाशवी इच्छा आणि वासना यातून व्यक्तिगत जीवन नियंत्रित नाही करता आले तर व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या जगण्यात अराजक निर्माण होईल, ही भीती विशाल हृदयी संतांना सतत कार्य करण्यासाठी भाग पाडत आहेत. वारकरी सांप्रदायातील चैतन्यभाव हा साऱ्या अनर्थांना टाळण्याचे बळ देतो. जगताचे मूळ अधिष्ठान चैतन्य आहे आणि या चैतन्याला तो प्राधान्य देतो आहे. माऊली या तत्त्वास
या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्गंगत । ते तत्त्वज्ञ संत । जाणती ।।
जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता मान्य करून धन आणि पदार्थांचा संग्रहही या सांप्रदायास मान्य आहे. परंतु, मिळालेले धन हे उत्तम मार्गाने मिळालेले असावे. धन मिळविण्याचे व्यवहार हे उत्तमच असायला हवेत. कुणाचे शोषण करून, भ्रष्ट मार्गाने धन निषिद्ध मानले आहे. तुकोबाराय म्हणतात,
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करो ।’
हे सद्यकालीन वारकरी सांप्रदायाचे औचित्य आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला समाजात मिळणारी प्रतिष्ठा पाहिली की धनाचे वरील प्रतिपादित सूत्र किती खोल आहे हे समजून येते. पुढे तुकोबाराय सांगतात. धन मिळवा, प्रापंचिक गरजा पूर्ण करा पण, आजूबाजूच्या अगतिक, दीन-दुबळ्या बांधवांच्या हितासाठी थोडा तरी उपकार करा.
तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ।।
मानवी जीवनात जेव्हा लोभ आणि बळ यांचे अमर्याद पूजन होते तेव्हा व्यक्तीला तिच्यातील मानवतेचा विकास करणे शक्य होत नाही.
व्यक्तीचा विकास अथवा थोरवी त्याच्याकडे किती बल आहे, किती संपत्ती आहे यावर अवलंबून न राहता वास्तविक तो कशा स्वभावाचा आहे, यावर अवलंबून असते म्हणूनच व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या प्रमाणात्मक निकषांऐवजी गुणात्मक निकषांवर ठरू लागला तर समाज उत्तरोत्तर गुणात्मक निकषांवर विकसित होईल. यावर विश्वास ठेवूनच हा भागवत धर्म आचार-विचार सांभाळतो आहे तसे नसते तर आम्ही पालख्या सत्ताधीशांच्या, संपत्तीधीशांच्याच उचलल्या असत्या आणि आमचे खांदे संपून गेले असते. पण, आज पालख्या उचलल्या जातात ज्यांनी उच्चविचार, आचार आणि साधनेची पेरणी करण्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षण-क्षण वेचला त्यांच्या पालख्यांचे भोई होण्यासाठी लाखो भागवतवीर आज पालख्यांसोबत प्रवास करत आहे. आज कोणासोबत चार पावले चालावीत हा प्रश्न असताना पालख्यांसोबत शेकडो किलोमीटर चालण्यासाठी श्रद्धावान, चांगुलपणावर श्रद्धा असणाºया माणसांची धडपड चालूच आहे. कारण ही वारी आयुष्याची योग्य वाट दाखवत आहे. कारण...
वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार । होती उपकार अगणित ।।
या कृतज्ञेतूनच सर्वजण पालखीबरोबर चालत आहेत.
(लेखक संत साहित्याचे
अभ्यासक आहेत.)