तुकाराम महाराज पालखीत छत्रपती घराण्याची पताका, शिवकालीन परंपरा पुन्हा सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:29 PM2022-06-20T12:29:48+5:302022-06-20T12:46:55+5:30
स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदाय अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवला.
कोल्हापूर : आषाढी यात्रेला जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या छत्रपती घराण्याकडून जरी पताका देण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला असून, रविवारी या मानाच्या जरी पताकाचे विधिवत पूजन करून मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदाय अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवला. पंढरीच्या वारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे हा जरी पताका होय. तीच परंपरा पुढे अखंडित सुरू ठेवण्यासाठी भक्ती व शक्ती एकत्रितपणे नांदविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सर्व विश्वस्थ यांच्या व युवराज संभाजीराजे यांच्या सहमतीने शिवकालीन परंपरा पुन्हा सुरू करण्याचा एकमताने निर्णय झाला आहे.
यावर्षीपासून मानाचा जरी पताकाचे विधिवत पूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते रविवारी भवानी मंडप, जुना राजवाडा येथे करण्यात आले. जरी पताकाचे मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर ) यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला. हा जरी पताका आज, सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळेला छत्रपती यौवराज शहाजीराजे व मानकरी प्रा. महादेव तळेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.
भवानी मंडप येथे झालेल्या जरी पताका पूजन सोहळ्यास फत्तेसिंग सावंत, भास्कर तळेकर, बाबूराव तळेकर, धनंजय तळेकर, विजय गावंधरे, पांडुरंग सुरवसे, प्रसन्न मोहिते, विकास देवाळे, प्रवीण पवार, उदय घोरपडे, डी. के. खाडे, उदय बोंद्रे उपस्थित होते.