फसवणूक प्रकरणातील व्हिजन ॲग्रोच्या तुकाराम पाटीलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:05 AM2021-01-12T11:05:20+5:302021-01-12T11:07:41+5:30
Crimenews Fraud, Kolhapur- गुंतविलेल्या पैशांवर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रॉडक्टस् कंपनीचा पसार झालेला संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) यास सोमवारी अटक केली.
कोल्हापूर : गुंतविलेल्या पैशांवर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रॉडक्टस् कंपनीचा पसार झालेला संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) यास सोमवारी अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतोली फाटा येथे सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. डॉ. पाटील याला आज, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
व्हिजन ॲग्रो कंपनीच्या नावाखाली गुंतवणूक केलेल्या पैशांवर नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसात मुख्य सूत्रधार विकास खुडेसह संचालकांवर गुन्हे दाखल होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यांनी मुख्य सूत्रधार विकास खुडे, सुशील शिवाजी पाटील (यवलूज, ता.पन्हाळा) याला यापूर्वीच अटक केली आहे, तर डॉ. तुकाराम पाटील हा पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा येथे येणार असल्यााची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मिळाली.
त्यावेळी पो. नि. अशोक इंदलकर, सहायक फौजदार दिलीप कारंडे, हवालदार दिनेश उंडाळे आदींनी कोतोली फाटा येथे सापळा रचून त्याला अटक केली. खुडे हा सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कंपनीचा संचालक प्रसाद आनंदराव पाटील (रा. निवृत्ती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याचाही पोलीस शोध घेत आहेत.
संशयितांकडून तब्बल ३० लाखांची मालमत्ता जप्त
आर्थिक गुन्हे पोलीस पथकाने आतापर्यंत संशयित आरोपींकडून २३ तोळे सोने, दोन चारचाकी आलिशान मोटार, दुचाकी, लॅपटॉप, कॉम्प्युटर असा सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध सुरू असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.