महाराष्ट्राच्या एकसंघतेसाठी तुकोबांची गाथा गरजेची
By Admin | Published: April 5, 2017 12:48 AM2017-04-05T00:48:25+5:302017-04-05T00:48:25+5:30
शिवाजीराव भुकेले : मुरगूडला सदाशिवराव मंडलिक आणि विजयामाला मंडलिक स्मृती व्याख्यानमाला
मुरगूड : महाराष्ट्र संस्कृतीत संत परंपरेच्या विरोधात ठामपणे लढणारा कुणबी संत मानवतावाद आणि साम्यवादाचा कृतिशील पुरस्कर्ता संत म्हणजेच तुकाराम होय. तुकोबांच्या अभंगांनी महाराष्ट्र अखंड राहिला आहे. एकात्मतेसाठी तुकोबांचे कार्य डोंगराएवढे आहे. संप्रदाय बंदिस्त कुंपणात अडकल्यामुळेच तुकोबांनाही संप्रदायी म्हणता येणार नाही. सध्या तुकोबांना समाजाने विशिष्ट धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. संत परंपरेतील सर्वांत साधक अवस्था त्यांची होती; त्यामुळेच तुकोबांचे साडेचार हजार अभंग गाथा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे. म्हणूनच महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी तुकोबांची गाथा गरजेची आहे, असे मत संत साहित्यक डॉ. शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केले.
मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्यावतीने दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि विजयामाला मंडलिक स्मृती व्याख्यानमालेत तुका आकाशाएवढा या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, बिद्रीचे माजी संचालक विजयसिंह मोरे, सत्यजित जाधव प्रमुख उपस्थित होते.
भुकेले म्हणाले, संस्काराचे विद्यापीठ असणारी कुटुंबव्यवस्था संत तुकोबांचे विचार आणि थोर संस्कारामुळेच वाचेल. तुकोबांच्या गाथ्यांनीच महाराष्ट्र अभंग राहिला आहे. तुकोबांना आम्ही आध्यात्मिक करून समाजशीलतेच्या जाणीवेपासून दूर केले आहे. बहुजनांची व्यथा, कथा चित्रित करणारा चित्रफलक म्हणजे तुकोबांचे विचार होय. ते मानवाला जगण्याचा वस्तुपाठ म्हणून उपयोगी आले. परंपरागत विचारसरणीच्या प्रस्थापितांना विचारपूर्वक धक्का देत त्यांनी समाजाच्या हिताची भूमिका प्रत्यक्ष कृतीतून व अभंगातून मांडली. म्हणूनच एकविसाव्या शतकातही तुकोबा आम्हाला मार्गदर्शकच आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पी. डी. मगदूम यांच्या हस्ते पाहुण्यांच्या सत्कार झाला. मंडलिक आखाड्याची महिला मल्ल नंदिनी साळुंखे व स्वाती शिंदे, अंकिता शिंदे यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार झाला. स्वागत प्रा. महादेव सुतार यांनी तर प्रास्ताविक अनिल सिद्धेश्वर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. आभार संतोष कुडाळकर यांनी मानले. माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, नगरसेवक रवीराज परीट, सुप्रिया भाट, संगीता चौगले, संभाजी आंगज, सुनीता कळंत्रे, अमर पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)