तुळशी विवाहाने दिपोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:36 PM2017-11-01T15:36:42+5:302017-11-01T15:42:11+5:30
उसाची धाटं, झेंडूच्या फुलांच्या माळा, हिरव्या बांगड्या, मणी-मंगळसुत्रांनी सजलेले तुळशी वृंदावन, मंगलाष्टक, आरती, प्रसाद वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तुळशी विवाह धुमधडाक्यात संपन्न झाला. या विधीने खऱ्या अर्थाने दिवाळी या दिपोत्सवाची सांगता झाली.
कोल्हापूर ,दि. १ : उसाची धाटं, झेंडूच्या फुलांच्या माळा, हिरव्या बांगड्या, मणी-मंगळसुत्रांनी सजलेले तुळशी वृंदावन, मंगलाष्टक, आरती, प्रसाद वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तुळशी विवाह धुमधडाक्यात संपन्न झाला. या विधीने खऱ्या अर्थाने दिवाळी या दिपोत्सवाची सांगता झाली.
दिवाळीचा सहा दिवसांचा सोहळा संपल्यानंतर अनेक कुटूंबांनी सुट्यांचा बेत आखून पर्यटनाचा आनंद लुटला.
दिपोत्सवाच्यानंतर आठ दिवसांनी तुळशी विवाह संपन्न होतो. तुळशी विवाह आणि त्रिपूरारी पौर्णिमेनंतर दारात लावलेले आकाशकंदिल आणि विद्यूत माळा काढल्या जातात आणि पंधरा दिवस धामधूमीत साजरा झालेल्या दिवाळीची खऱ्या अर्थाने सांगता होते.
तुळशी विवाहाच्या निमित्ताने दुपारनंतर घराघरात या विवाह सोहळ््याची तयारी सुरू झाली. तुळशी वृंदावनला आकर्षक रंगांनी रंगवून त्यावर फुलांच्या माळा तसेच विद्यूत माळा लावण्यात आल्या. दारात सुरेख रांगोळी आणि त्यावर मिणमिणता दिवा लावण्यात आला.
तुळशीत श्रीकृष्णाची मूर्ती, मणी मंगळसुत्र, हळदी-कुंक ठेवून समोर अभिषेक चिरमुरे बत्तासेचा नैवेद्य ठेवण्यात आला. मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत तुळशी विवाहाचा सोहळा झाला.
बच्चे कंपनीने दिवाळीत राखून ठेवलेल्या फटाक्यांची आतषबाजी केली. रात्री गोडाधोडाचे जेवण झाले अशारितीने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या दिवाळीच्या उत्सवाची सांगता झाली.