अडचणींवर मात करत पेटणार तांबाळे साखर कारखान्याचे धुराडे -
By admin | Published: December 29, 2015 11:46 PM2015-12-29T23:46:11+5:302015-12-30T00:29:20+5:30
गुड न्यूज
गारगोटी : अखेर तीन वर्षांनी तांबाळे कारखान्याचे धुराडे पेटणार आहे. सुरुवातीपासून अनेक अडचणींवर मात करीत उभ्या असलेल्या इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखान्यातील संस्थापक अध्यक्ष सौ. विजयमाला देसाई, सर्व संचालक मंडळ यांनी हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांनी दिलेली साथ वाखाणण्यासारखी आहे.
भारतात १९९६ साली महिला विषयक धोरण जाहीर झाले. या धोरणाला अनुसरुन विजयमाला देसाई यांनी त्यांचे पतिराज बाजीराव देसाई यांच्या मदतीने साखर कारखाना उभारणीकरिता प्रयत्न सुरु केले. त्याचाच परिपाक अथांग प्रयत्नांनी जगातील पहिला महिला साखर कारखाना तांबाळे येथे उभारला गेला. सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. ते साल होते २00२. या कारखान्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
पुढे २00३ ते २00४ साली उसावर अस्मानी संकट आले ते म्हणजे लोकरी मावा. या माव्याने उसाची उभी पिके नष्ट झाली. यावेळी कारखाना केंद्र शासनाने केवळ महिलाविषयक धोरण जाहीर केले पण कोणतेही विशेष असे पॅकेज न दिल्याने कारखाना अधिक आर्थिक संकटात सापडत चालला. शेतकऱ्यांची ऊसबिले व कामगारांचे थकीत पगार भागवणे अवघड झाले. म्हणून संचालक मंडळाने २00५ साली हा कारखाना गोदावरी शुगरकडे भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. त्यांनी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला. त्यामुळे शेतकरी या कारखान्याकडे ऊस स्वत:हून पाठवू लागला. तालुक्यात लाखो टन उभा असणारा ऊस संपवण्यासाठी मे अथवा जून महिना उजाडायचा, पण या कारखान्यामुळे तो मार्च एप्रिल महिन्यात संपू लागला. २00७ अखेर हा कारखाना गोदावरी शुगर्सकडे होता. पण प्रशासन, कामगार व गोदावरी शुगर्सची वाढलेली अरेरावी यामुळे संपूर्ण प्रक्रियेत वितुष्ठ निर्माण झाले. अखेरीस हा कारखाना प्रशासनाने काढून घेतला. २00८ ते २00९ साली हा कारखाना संचालक मंडळाने चालविला. आर्थिक पाठबळ न मिळाल्याने अखेरीस २0१0, ११, १२ सालापर्यंत हा कारखाना पुन्हा सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी आरमुगा शुगर्सकडे देण्यात आला. त्यानंतर हा कारखाना पुन्हा बंद स्थितीत राहिला. हा कारखाना चालू व्हावा, यासाठी अध्यक्ष विजयमाला देसाई यांनी जिवाचे रान केले. तब्बल अडीच वर्षांनी हा कारखाना पुन्हा एकदा मुंबईस्थित एस. एम. प्रोजेक्ट या कंपनीकडे देण्यात आला आहे. योगायोग म्हणजे सौ. देसाई यांचा वाढदिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. त्याच दिवशी याची अधिकृत घोषणा होईल. गेली अडीच वर्षे २३0 कायम कामगार व १३0 हंगामी कामगार हे पगाराविना कार्यरत आहेत.
कारखाना सुरु होेणार असल्याच्या बातमीने शेतकरी व कामगार सुखावला आहे. कामगारांना सुधारित वेतनश्रेणीत पगार मिळेल, तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकतो, अशा सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत.