कुत्रा ओढतोय चक्क एक टनाची गाडी..

By admin | Published: February 27, 2017 12:03 AM2017-02-27T00:03:18+5:302017-02-27T00:03:18+5:30

राजधानी कृषी-पशुपक्षी प्रदर्शन; ९० किलो वजनाचा बोकड खास आकर्षण, डॉग शोलाही गर्दी

A tunny car pulling dog .. | कुत्रा ओढतोय चक्क एक टनाची गाडी..

कुत्रा ओढतोय चक्क एक टनाची गाडी..

Next

सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावरील राजधानी राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा तिसरा दिवसही सुट्यांमुळे उच्चांकी गर्दीचा ठरला. या प्रदर्शनातील एक टनाची गाडी ओढणारा कुत्रा, ९० किलो वजनाचा बोकड आकर्षण ठरत असून, रविवारचा डॉग शोही लक्षवेधी ठरला.
स्मार्ट एक्स्पो ग्रुप, युवराज वीरप्रतापसिंहराजे भोसले प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात सध्या विशेष आकर्षण ठरत आहे ते १ टनाची नॅनो गाडी ओढणारा कुत्रा आणि १ टन वजनाचा महाकाय बैल. रविवारी दुपारी झालेल्या डॉग शोमध्ये अनेक जातीची कुत्री सहभागी झाली होती. यामध्ये पश्मिना, डाल्मेशन, लॅब्राडोर, अल्सेशिएन, कारवानी, ग्रेट डेन, ग्रे हाउंड, बुल डॉग, बॉक्सर, देशी, पामेरियन जातीची कुत्री प्रदर्शनात आणली होती. या प्रदर्शनात कुत्र्याच्या गळ्याला साखळी जोडून प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ओढलेली गाडी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात आली आहेत. त्यात महाकाय भोपळा, देशी नव्या वाणाची वांगी, भले मोठे आल्याचे कंद, टपोरी ज्वारी, लाल, पिवळ्या, निळ्या रंगाची सिमला मिरची, महाकाय ऊस, नजरेत भरतील अशी ज्वारीची कणसे, मोठी स्ट्रॉबरी येथे पाहायला मिळत आहेत. तसेच सेंद्रिय गूळ, सेंद्रिय काकवी, अनोखी लिंबांची जात, बेंगलोर येथील फुलोत्पादक संस्थेने खास विक्रीस आणलेले ग्लॅडिओल, कारनेशन, जरबेरा, निशीगंध आदी फुलांचे कंद तसेच बियांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे.
प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे ट्रेलर, ट्रॅक्टर्स, शेती अवजारे, नांगरणी मशीन, पेरणी मशीन, ठिबक सिंचनाचे प्रकार, स्प्रिंकलर सिस्टीम, नेटाफिम सेवेची दालने, विविध बी-बियाणे, घरगुती ताक, राजस्थानी लोणची, तसेच विविध चवीच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत.
कृषी प्रदर्शनामध्ये कडधान्य महोत्सव व तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरती कोलम, वाडा कोलम, बासमती तुकडा, बासमती आख्खा, आंबेमोहोर, इंद्रायणी, काळी साळ, घनसाळ, दिल्ली राईस, तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी आदींच्या वाणाचे प्रकार विक्रीस ठेवण्यात आले आहेत. या प्रदर्शनामध्ये ऊस पीक स्पर्धा, भाजीपाला, द्राक्षे, बेदाणे स्पर्धा यांचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बी-बियाणे, शेती अवजारे, खते औषधे, उपलब्ध होत आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक सोमनाथ शेटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A tunny car pulling dog ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.