वैरणीचा भारा ठरतोय मृत्यूचा फेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:47+5:302021-09-16T04:29:47+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पावसाळ्यात शेतातून वैरणीचा भारा घेऊन येताना पाय घसरुन पडून मृत्यू अथवा कायमचे ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पावसाळ्यात शेतातून वैरणीचा भारा घेऊन येताना पाय घसरुन पडून मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वर्षाला पंधरा ते वीस घटना जिल्ह्यात अशाप्रकारच्या घडत असून, वैरणीचा भारा मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने मृत्यूचा फेरा ठरत आहे.
शेतीला दूध व्यवसाय हा जोड असल्याने येथे जनावरांची संख्या खूप आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरात सरासरी दोन जनावरे असतात. दूध उत्पादकांना रोज वैरण आणावी लागते. एक-दोन तालुके वगळता सर्वच ठिकाणी डोगरावरील वैरणच उत्पादकांसाठी पर्याय असतो. त्यात येथे जून ते सप्टेंबरअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने डोंगर माथा अथवा शेतात दलदल अधिक असते. सततच्या पावसामुळे डोंगरावर शेवाळ तयार झालेले असते. त्यावर पाय पडल्यास तो सरकतो. त्यातूनच अपघात हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. वैरणीचा भारा मानेवर पडल्याने मृत्यू पडलेल्यांची किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अंगावर वैरणीचा भारा पडून मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात दरवर्षी १५ ते २० जणांचा अशाप्रकारे अपघात होत असल्याने त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
का होतो मृत्यू....
शेतकरी डोक्यावर भारा घेऊन जात असताना पाय घसरतो. डोक्यावरील भारा मानेवर जोरदार आदळतो. त्यामुळे मणक्यावर आघात होऊन तो मोडतो. मणक्याच्या मध्यभागी असलेल्या मज्जातंतूला मार बसून मृत्यू होतो.
८० टक्के लोकांना कायमचे अपंगत्व
या अपघातामध्ये मज्जातंतूला मार बसल्यानंतर श्वसन यंत्रणा थांबते आणि त्यात मृत्यू हाेतो. मृत्यूचे प्रमाणे ८ टक्के आहे. वेळेत उपचार झाले, तर १२ टक्के लोकांचा यातून जीव वाचू शकतात. उर्वरित ९० टक्के लोकांना कायमचे अपंगत्व येते. काहींची कमरेखाली दोन पायांमधील ताकद जाते, तर काहींना खांद्याच्या खाली संवेदनाच नष्ट होतात.
शेतकऱ्यांनी काय करावे.....
आपल्याला पेलेल एवढेच ओझे डोक्यावर घेणे.
निसरडे असेल तर त्यातून ओझे घेऊन जाताना पायाची बोटे चिखलात रुतवूनच पुढे जावे.
पायात घसरणारे बूट, चपलांचा वापर टाळावा.
भारा अंगावर पडल्यानंतर काय करावे...
संबंधित व्यक्तीला तातडीने उचलून सरळ झोपवावे.
गाडीमध्ये झोपवूनच उपचारासाठी रुग्णालयात आणावे.
शक्यतो लिफ्ट असलेल्या रुग्णालयातच आणावे.
स्थानिक अथवा इतर रुग्णालयांत उपचार न करता थेट न्युरो सर्जनकडे आणावे.
कोट-
अपघात हा पहिला मार असतो आणि त्याच्यावर उपचार होईपर्यंत दुसरा मार त्या व्यक्तीला सहन करावा लागतो. संबंधित व्यक्तीचे शरीर न वाकवता सरळ झोपवून तातडीने न्युरो सर्जनकडे उपचारासाठी नेल्यास दुसरा मार कमी होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. मात्र अनेक घटनांमध्ये रुग्णाला अनेक रुग्णालयांतून फिरवत आणले जाते.
- डॉ. संदीप इंचनाळकर (न्युरो सर्जन, कोल्हापूर)