आॅटोलूममुळे साधे यंत्रमाग अडचणीत
By admin | Published: August 9, 2016 11:34 PM2016-08-09T23:34:23+5:302016-08-09T23:52:19+5:30
वस्त्रोद्योगामध्ये आर्थिक मंदी : इचलकरंजीत कापड उत्पादनातील स्पर्धा घातक
इचलकरंजी : शहरामध्ये विविध प्रकारचे कापड साध्या यंत्रमागावर आणि आॅटोलूमवर विणले जाते. सध्या वस्त्रोद्योगात असलेली आर्थिक मंदी साध्या यंत्रमागाबरोबरच आॅटोलूम कारखानदारांना सुद्धा सतावते आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कापड प्रकाराच्या दरामध्ये थोडी सुधारणा झाल्यास हे कापड यंत्रमागाबरोबरच आॅटोलूमवर सुद्धा उत्पादित होत असल्याने साधे यंत्रमाग कारखानदार मात्र अडचणीत आले आहेत.
गेल्या वर्षाहून अधिक काळ वस्त्रोद्योगामध्ये कमालीची आर्थिक मंदी आहे. कोणत्याही प्रकारच्या कापडाला मागणी नाही, तर कापसाचे दर वाढल्यामुळे सुताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर अधिक आहेत. साहजिकच राज्यातील कापडाच्या उत्पादनाला अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक खर्च येत आहे. उत्पादन खर्चाएवढा कापडास भाव मिळत नसल्याने यंत्रमागासह आॅटोलूम कारखानदारांना नुकसान सोसावे लागत आहे.
साध्या यंत्रमागावर पॉपलीन आणि मलमल हे कापड उत्पादित होत होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्हीही कापडाच्या प्रकारामध्ये मागणी नसल्याने यंत्रमागधारकांना नुकसान होऊ लागले. त्यामुळे बहुतांश यंत्रमागधारकांनी या कापडाचे उत्पादन कमी केले, तर काही कारखाने बंद राहिले. आता पॉपलीन या कापड प्रकारासाठी चांगला भाव मिळू लागला आहे. याचा फायदा आॅटोलूम कारखानदार उचलू लागले आहेत. साध्या मागावर एका दिवसात सुमारे ८० ते १०० मीटर कापड निघते. त्याला जॉबवर्क पद्धतीने सहा पैसे प्रतिमीटर मजुरी मिळते, तर आॅटोलूमला डबल पन्ह्याचे कापड निघते. त्याला आपोआपच १२ पैसे प्रतिमीटर मजुरी मिळते. आॅटोलूमवर दिवसभरात ६०० मीटर कापड उत्पादित होते. म्हणजे सुमारे १२ यंत्रमागांवर उत्पादित होणारे कापड दोनच आॅटोलूमवर उत्पादित होते.
अशा परिस्थितीचा लाभ सध्या आॅटोलूमचे कारखानदार घेऊ लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होऊन यंत्रमाग कारखान्यांना मात्र त्याचा फटका बसू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर साधे यंत्रमाग विरुद्ध आॅटोलूम अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे यंत्रमाग कारखानदार मात्र आणखीन अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)
घातक कापड उत्पादनाचा संघटित विचार व्हावा
शहरामध्ये असलेल्या यंत्रमागधारकांच्या चारही संघटनांनी आयोजित केलेल्या आजी-माजी आमदार व आजी-माजी खासदार यांच्या व्यापक बैठकीमध्ये वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदीबाबत सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे ठरले.
काही कापड प्रकार उत्पादन करण्यामध्ये निर्माण झालेली यंत्रमाग व आॅटोलूम यांच्यातील स्पर्धा यंत्रमागासाठी घातक ठरत आहे. त्याबाबतचा सांगोपांग विचार या आजी-माजी आमदार व खासदारांच्या समितीने करावा, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत आहे.