ऐन मान्सूनमध्ये वळवाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:15 PM2020-07-25T19:15:18+5:302020-07-25T19:17:42+5:30
ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस बरसत आहे. शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. १० मिनिटे पाऊस झाला; मात्र त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले.
कोल्हापूर : ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस बरसत आहे. शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. १० मिनिटे पाऊस झाला; मात्र त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले.
गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असून नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. मात्र कोल्हापुरात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस पडेना. ढगाळ वातावरण असले तरी हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
दुपारी तीन वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस कोसळला. केवळ १० मिनिटे आडव्यातिडव्या पावसाने झोडपून काढले. त्यानंतर मात्र ऊन पडले. पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून सोडले. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी त्यानंतर पाऊस झाला.
ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पडेल तिथेच पडेल असाच पाऊस असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके माना टाकू लागली आहेत. भातपिकाला कायम पाणी लागते. ते नसल्याने पिके पिवळसर पडू लागली आहेत. वाढ खुंटल्याने उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा, टीएमसीमध्ये असा-
राधानगरी : ५.२७ (८.३६१), तुळशी : १.९४ (३.४७१), वारणा : २२.११ (३४.३९८), दूधगंगा : १६.६४ (२५.३९२), कासारी : १.७५ (२.७५२), कडवी : १.३७ (२.५१५), कुंभी : १.७९ ( २.७१३), पाटगाव : २.५९ (३.७१६).