पाच दिवसांत ३५ लाखांची उलाढाल
By admin | Published: February 9, 2015 12:16 AM2015-02-09T00:16:45+5:302015-02-09T00:41:13+5:30
ताराराणी महोत्सव : तांदूळ खरेदीसाठी उड्या
कोल्हापूर : नाशिकचे मांडे... भाजी-भाकरी... मांसाहारी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी स्टॉलवर लागलेली गर्दी; तर तांदूळ व मासळी खरेदीसाठी ग्राहकांच्या पडलेल्या उड्या... हे चित्र होते ताराराणी महोत्सवाचे! रविवारी पाचव्या दिवशी या महोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून सुमारे १० लाखांची उलाढाल झाली. आतापर्यंत ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’ प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर सुरू आहे. रविवारी, पाचव्या दिवशी तुडुंब गर्दी झाली. आतापर्यंत तब्बल ३५ लाखांची उलाढाल झाली. यामध्ये रविवारी सुटीच्या दिवशी झालेल्या तुडुंब गर्दीमुळे उलाढाल १० लाखांच्या घरात पोहोचली. शहरासह ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देऊन प्रदर्शनाची पाहणी करीत होते. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दीड हजारांहून अधिक महिलांनी भेट दिली.शहर, उपनगरांसह परगावचे लोकही प्रदर्शनाला भेट देत आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.
बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अधिक गर्दी होती. नागरिक कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रश्श्यावर ताव मारताना दिसत होते. त्याशिवाय भाजी-भाकरी, खर्डा-भाकरी, वडा-पाव, मिसळ अशा खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील गर्दीही हटत नव्हती. त्याशिवाय बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ घेण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडत होत्या. यामध्ये तांदूळ व मासळी यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सुटीचा दिवस असल्याने झालेल्या गर्दीने तांदूळ व मासळी सकाळच्या टप्प्यातच संपली. त्यामुळे तांदूळ व मासळी पुन्हा मागविण्यात आली. महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कलाकारांनी लावणी नृत्याचे आविष्कार सादर केले. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या ताराराणी महोत्सवातील बचत गटांच्या प्रदर्शनात रविवारी नाशिक येथील महिला बचत गटाच्या महिला मांडे व पुरणपोळी करताना पाहण्यासाठी झालेली गर्दी.