बिद्री कारखान्याची ऊसतोडणी बंद
By Admin | Published: November 23, 2014 12:37 AM2014-11-23T00:37:52+5:302014-11-23T00:37:52+5:30
तांत्रिक बिघाड : बॉयलर ट्युबला गळती; लाखो रुपयांचे नुकसान
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात यावर्षी बसविलेल्या नवीन बॉयलर ट्युबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काल, शुक्रवारी सायंकाळपासून कार्यक्षेत्रातील
२१८ गावांत ऊसतोडणी बंद करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याच्या तसेच वाहनतळावरील वाहनातील ऊस, शेतात तुटलेला ऊस यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बिद्री साखर कारखाना नुकताच सुरू झाला. आजचा गळिताचा दहावा दिवस आहे. आतापर्यंत एकूण २७ हजार ३५० मे. टनांचे गाळप झाले. त्यातून १९ हजार ३५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले. चार दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे तीन दिवस हंगाम बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखाना व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल, शुक्रवारी सायंकाळी कारखान्यात कोट्यवधी रुपये खर्चून नवीन बसविलेल्या बॉयलरच्या चार ट्युबमध्ये गळती लागल्याने पुन्हा कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. हा तांत्रिक बिघाड काढण्यासाठी बॉयलर गार करावा लागणार आहे. त्यामुळे किती दिवसांनी काम पूर्ण होणार याकडे ऊस उत्पादक व वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या वाहन तळावर उसाने भरलेले ९२ ट्रक, ३२५ ट्रॅक्टर-ट्रॉली, ९० बैलगाड्या अशी ५०७ वाहने उभी आहेत. शेतात तुटून पडलेला ऊस तसाच वाळत पडला, तर ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. बॉयलरचा बिघाड काढण्यासाठी कारखाना बंद ठेवावा लागणार असून, पुन्हा एकदा बॉयलर ट्युबचा प्रश्न चर्चेत आला आहे, तर याबाबत ऊस फडात चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)