दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:56 AM2019-10-31T11:56:08+5:302019-10-31T12:01:48+5:30
दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर : दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
मंदी आणि महापूर यांमुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यास मिळत होता. दिवाळीत मात्र, चित्र वेगळे पाहण्यास मिळाले. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांचे औचित्य साधत ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे अपेक्षित व्यवसाय झाल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून येत आहेत.
या दोन दिवसांमध्ये घरगुती वस्तूंसह इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी बाजारपेठ फुलून गेली होती. दुचाकी-चारचाकीची वाहनखरेदीसाठीही गर्दी झाली. सोने-चांदीसह फ्रिज, वॉशिंग मािीन, ओव्हन, नवीन मोबाईल, होम थिएटरच्या खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. महाद्वार रोड, पापाची तिकटी, गुजरी, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी स्टेडियम येथील शोरूममध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची लगबग पाहण्यास मिळाली. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कोट्यवधींची उलढाल झाली.
आकर्षक योजना
दिवाळीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विविध कंपन्यांनी उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी आकर्षक योजना आणल्या होत्या. या योजनांचा कोल्हापूरकरांनी लाभ घेतला. शून्य टक्के कर्जयोजना, स्क्रॅर्च कार्ड आणि ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
पावसाने दिली उघडीप
दिवाळीच्या चार दिवस अगोदर कोल्हापूरला मुसळधार पावसाने झोडपले. ऐन दिवाळीवेळीच पावसाने उघडीप घेतल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला. बाजारपेठेमध्ये उत्साही वातावरण पाहण्यास मिळाले.
महापुरामुळे मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. याचबरोबर मंदी आणि भाववाढीमुळे दिवाळीमध्ये व्यवसाय होईल का, याबाबत संभ्रम होता. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. भाऊबीजेदिवशीही गर्दी कायम होती. या दिवाळीतील हंगाम अपेक्षेपेक्षा चांगला झाला.
- मुरलीधर चिपडे,
चिपडे सराफ
वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. पाडवा आणि भाऊबीजेदिवशी सुदैवाने पावसानेही साथ दिली. त्यामुळेच ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. मंदीचे सावट असतानाही पाडव्याला अपेक्षापेक्षा जास्त व्यवसाय झाला.
- दीपक केसवाणी,
राजाकाका