जिल्ह्यात साडेतीनशे कोटींची उलाढाल

By admin | Published: November 14, 2016 12:40 AM2016-11-14T00:40:08+5:302016-11-14T00:40:08+5:30

नोटा रद्दचा परिणाम : तीन दिवसांपासून ५६८ शाखांमधून डिपॉझिट, वितरणाचे काम

Turnover in the district is about 3.5 trillion | जिल्ह्यात साडेतीनशे कोटींची उलाढाल

जिल्ह्यात साडेतीनशे कोटींची उलाढाल

Next

कोल्हापूर : चलन तुटवड्यानंतर निर्माण झालेल्या कोंडीमुळे जिल्ह्यातील सर्वच बॅँकांच्या उलाढालीवर परिणाम झाला असून, गेल्या तीन दिवसांत साडेतीनशे कोटींची उलाढाल झाली आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बॅँकांच्या ५६८ शाखांमधून डिपॉझिट, वितरणासह नोटा बदलून दिल्या जात आहेत.
राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँकांत पाचशे व एक हजाराच्या नोटा चार हजारांपर्यंत बदलून दिल्या जात आहेत; तर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत नोटा बदलून न देता त्या डिपॉझिट करून घेतल्या जात आहेत. बॅँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दोन हजार रुपये दिले जात असून, गरजेनुसार त्यामध्ये थोडी लवचिकताही बॅँकांनी ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध बॅँकांच्या ५६८ शाखांमधून मागील तीन दिवसांत साडेतीनशे कोटींची उलाढाल झाली आहे. यामध्ये २५० कोटी रुपये जमा, १२० कोटींचे वितरण, तर २२ कोटींच्या नोटा बदलून दिल्या आहेत. दरम्यान, चलन तुटवड्याचा मोठा फटका सहकारी बॅँकांना बसला.
ग्रामीण भागात सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या माध्यमातून सर्व व्यवहार होतात; पण रिझर्व्ह बॅँकेने या बॅँकांनाच पैसे दिले नसल्याने कोंडी निर्माण झाली होती. जिल्हा बॅँकेला रविवारी सायंकाळी सव्वादोन कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवस प्रत्येक तालुक्याला किमान वीस लाख रुपये मिळणार असल्याने बऱ्यापैकी कोंडी फुटेल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी जिल्हा बॅँकेतील चलनप्रवाह काहीसा कमी दिसत होता.
आज व्यवहार बंद, कामकाज सुरू!
आज, सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त सर्वच बॅँकांना सुटी आहे; पण गेले तीन-चार दिवसांत झालेले व्यवहार व त्या आनुषंगिक कामांची पूर्तता करण्यासाठी अनेक बॅँकांचे कामकाज सुरू राहणार आहे.
८ कोटी रुपये
नागरी सहकारी बँकांना
जिल्ह्यातील ४९ नागरी सहकारी बँकांना रविवारी ८ कोटी देण्यात आले. त्यामुळे गेले तीन दिवस नागरी बँकांचा ठप्प झालेला व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाला. या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या असल्याने ग्राहकांची कुचंबणा झाली; पण काही तरी असेना पैसे हातात मिळाल्याचा आनंद दिसत होता. रिझर्व्ह बँकेकडून शंभर व पाचशेच्या नवीन नोटांची छपाई झाली आहे. येत्या दोन दिवसांत या नोटा उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

Web Title: Turnover in the district is about 3.5 trillion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.