मसोलीत टस्कर हत्तीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:49+5:302021-05-14T04:24:49+5:30
आजरा : मसोली (ता. आजरा) येथील धनाजी कुंभार व शशिकांत कुंभार यांच्या मडुळकी नावाच्या शेतात रात्री टस्कर हत्तीने ...
आजरा : मसोली (ता. आजरा) येथील धनाजी कुंभार व शशिकांत कुंभार यांच्या मडुळकी नावाच्या शेतात रात्री टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला. सहा नारळाची झाडे उन्मळून टाकली. एक एकर क्षेत्रातील ऊस खाण्यासह तुडवून नुकसान केले आहे. १० ते १२ झाडांवरील फणस तोडून टाकले आहेत तर १८ ते २० केळीची झाडे मोडली आहेत. कुंभार यांचे अंदाजे एक लाखांवर नुकसान झाले आहे.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टस्कर हत्ती चाळोबाच्या जंगलातून थेट कुंभार यांच्या मडुळकी नावाच्या शेतात घुसला. सुरुवातीला ऊस व त्यामधील मक्याचे खाऊन व तुडवून नुकसान केले. त्यानंतर नारळाची झाडे उन्मळून टाकली. फणसाच्या झाडावरील फणस तोडून टाकले. केळीची झाडे व मोने मोडून टाकले आहेत. धनाजी कुंभार हे गावाजवळच असणाऱ्या शेतात राहतात. रात्रीच टस्कर कुंभार यांच्या शेतातील घराच्या दारात येऊन मोठ्याने चीत्कारला व मक्याचा कडबा फस्त केला आहे. वनविभागाचे वनपाल तानाजी कवळीकट्टी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
-------------------------
फोटो ओळी : मसोली (ता. आजरा) येथे टक्कर हत्तीने उन्मळून टाकलेले नारळाचे झाड. दुसऱ्या छायाचित्रात मसोली (ता. आजरा) येथे टस्कर हत्तीने ऊस पिकाचे केलेले नुकसान.
क्रमांक : १३०५२०२१-गड-०५/०६