टस्कर हत्ती रात्री मसोली गावात घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:21+5:302021-07-03T04:17:21+5:30
पाण्याच्या टाकीसह झाडे उपटली आजरा : आजरा तालुक्यातील दोन टस्कर हत्तीकडून मसोली व आंबाडे परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
पाण्याच्या टाकीसह झाडे उपटली
आजरा : आजरा तालुक्यातील दोन टस्कर हत्तीकडून मसोली व आंबाडे परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मसोली गावात रात्री टस्कर घुसून मोठ्याने चित्कारल्याने गावात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. याच टस्कराने प्राथमिक शाळेचे दारातील पाण्याची टाकी फोडली. नारळाची झाडे उपटून टाकली. भाताच्या तरव्यात तुडवन केले असून फणस खाऊन फस्त केले आहेत. मध्यरात्री गावचे ग्रामदैवत मसवाई देवीचे दर्शन घेऊन टस्कर हत्ती पहाटेच्या वेळी चाळोबाच्या जंगलात गेला आहे.
मसोलीत टस्कर हत्तीने रात्री जंगलातून येवून तुकाराम पोवार यांच्या घरापाठीमागील परसात प्रवेश केला. त्या ठिकाणी नारळाची झाडे पाडली. तर प्राथमिक शाळेच्या दारात असणारी पाण्याची टाकी विठोबा गुरव यांच्या परसात नेऊन फोडली आहे. तुकाराम तेजम यांच्या घराशेजारील नारळ, फणस, मेसकाठी यांचेही नुकसान केले आहे. टस्कर हत्तीने नुकसान करीतच गावातील मसवाईदेवीचे दर्शन घेतले. या ठिकाणी तो मोठ्याने चित्कारला व हरिजन वाड्याशेजारून पहाटे पाचनंतर तो पुन्हा जंगलात गेला आहे. टस्कर रात्री मोठ्याने चित्कारल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. टस्कराच्या भितीने घरातून कोणीही बाहेर पडले नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.
दुसऱ्या टस्कर हत्तीने आंबाडे येथील आबासाहेब कुरळे यांच्या शेतातील भाताचे तरवे खावून सर्वत्र तुडवून केली आहे.
फोटोकॅप्शन - १) मसोली (ता. आजरा) येथे टस्कराने शाळेच्या दारातील फोडलेली पाण्याची टाकी.
२). मसोली (ता. आजरा) येथील तुकाराम पोवार यांच्या घरा पाठीमागील परड्यात असणारे विस्कटून टाकलेले नारळाचे झाड.