शिवडाव येथे टस्कर हत्ती दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:09+5:302021-06-04T04:20:09+5:30
पाच दिवसांपूर्वी हत्तीने डेळे-भारमलवाडी जंगलात विश्रांती घेतली होती. त्यानंतर भारमलवाडी जंगलाची हद्दपार करून बुधवारी रात्री टस्कर अंतुर्लीच्या जंगलातून ...
पाच दिवसांपूर्वी हत्तीने डेळे-भारमलवाडी जंगलात विश्रांती घेतली होती. त्यानंतर भारमलवाडी जंगलाची हद्दपार करून बुधवारी रात्री टस्कर अंतुर्लीच्या जंगलातून अथणी शुगर्स कारखान्याच्या साईटवर दाखल झाला. तेथील तारेचे कुंपण तोडून शिवडावच्या जंगलात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पोहोचला. जंगला शेजारी असलेल्या धनगरवाड्यावरील हेमंत धाकू खरात यांच्या घरातील दरवाजा सोंडेने ढकलला. त्यामुळे घरातील लोक घाबरले होते. त्यानंतर प्रमोद मोरेकर यांच्या शेतातील उसाचे नुकसान करत जंगलाच्या दिशेने निघून गेला. दरम्यान, हत्ती पाहण्यासाठी ग्रामस्थानी गर्दी केली होती.
गेल्यावर्षीदेखील हत्तीने याच मार्गाने कोंडूशी जंगलातून पुढे वाकीघोल (ता. राधानगरी) व त्याही पुढे गगनबावडापर्यंत मजल मारली होती. या वेळी देखील हत्ती याच मार्गे पुढे जाण्याची शक्यता असल्याने भुदरगड, राधानगरीसह गगनबावडा वन विभागाने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
दरम्यान, हत्तीच्या मागावर वनरक्षक जॉन डिसोझा, वनमजूर तुकाराम लाड, मारुती गुरव, पकू तेजम, प्रकाश तवटे, अनिल पाटील, सतीश थवी, संजय तोरस्कर लक्ष ठेवून आहेत. हत्तीच्या वावर असणाऱ्या शेतात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
०३ शिवडाव हत्ती
फोटो : शिवडाव येथील शेतातील हत्तीच्या पायाचे ठसे.