नेसरी परिसरात टस्कर हत्तीचे दर्शन
By admin | Published: September 8, 2015 11:45 PM2015-09-08T23:45:49+5:302015-09-08T23:45:49+5:30
टस्करचे व्हॉटस् अॅपद्वारे व्हायरल
नेसरी : नेसरीसह तळेवाडी, अर्जुनवाडी परिसरात टस्कर हत्तीचे अचानक दर्शन झाले. परिसरातील शेतवडीत टस्कर दिसल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला असून, हत्ती आल्याची बातमी समजताच तरुण वर्ग हत्तीला पाहण्यासाठी धावपळ करीत होता.
या टस्कर हत्तीचा वावर चंदगड तालुक्यातील नागनवाडी क्षेत्रातील जंगलात सोममवारपासून होता. मंगळवारी पहाटे अर्जुनवाडी, तळेवाडी परिसरात अचानक आगमन झाले. हत्ती आल्याची बातमी नेसरी पोलीस ठाण्याला कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास तळेवाडी मार्गे नेसरीकडे या हत्तीने आगमन केले. येथील नेसरी-आजरा मार्गावरील मारियान रेगे या शेतकऱ्याच्या शेतातून कृषी महाविद्यालयाच्या परिसरात फिरून परत मारियान रेगे यांच्या शेतात टस्कर दोन तास ठाण मांडून होता.हत्तीला पाहायला झालेली गर्दी व गोंधळामुळे हत्ती बिथरून पळत होता. बघ्यांची यामुळे कमरणूक झाली. दरम्यान, वनविभागानेही शर्थीचे प्रयत्न करून तळेवाडी-अर्जुनवाडी या आलेल्या वाटेनेच माघारी फिरविले. या धावपळीत रेगे यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले. नेसरीचे सपोनि राकेश हांडे व कर्मचारी वनरक्षक बी. बी. पाटील, बाळकृष्ण दरेकर, लक्ष्मण पाटील, राजन देसाई, आदी अधिकाऱ्यांसह वनविभागाचे कर्मचारी टस्करावर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)
टस्करचे व्हॉटस् अॅपद्वारे व्हायरल
यापूर्वी सामानगड, बटकणंगले, हंदेवाडी मार्गे किणे पठारावरून हत्ती गेल्याचा, तर कानडेवाडी येथील भैयासाहेब कुपेकर यांच्या शेतात हत्तीच्या पाऊलखुणा दिसल्या होत्या. मात्र, मंगळवारी दिवसाढवळ्या हत्तीचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. तरुण वर्गाची हत्तीला पाहण्यासाठी गर्दी होती. बऱ्याच मोबाईलधारकांनी या हत्तीची प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करून व्हॉटस अॅपद्वारे व्हायरल केली.