वेळवट्टी परिसरात टस्कर हत्तींचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:44+5:302021-03-13T04:45:44+5:30

* घाटकरवाडीत गस्त पथकासमोरच टस्कर आल्याने भंबेरी आजरा : घाटकरवाडी व वेळवट्टी परिसरात दोन टस्कर हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. ...

Tusker elephant poaching in Velvatti area | वेळवट्टी परिसरात टस्कर हत्तींचा धुडगूस

वेळवट्टी परिसरात टस्कर हत्तींचा धुडगूस

Next

* घाटकरवाडीत गस्त पथकासमोरच टस्कर आल्याने भंबेरी

आजरा : घाटकरवाडी व वेळवट्टी परिसरात दोन टस्कर हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. घाटकरवाडीत गवुळदेव नावाच्या शेतात रात्री साडेबाराच्या सुमारास हत्तीच्या मागोव्यासाठी असलेल्या पथकासमोरच टस्कर हत्ती आल्याने सर्वांची भंबेरी उडाली. प्रसंगावधान राखून वनकर्मचऱ्यांनी टस्कराला जंगलात हुसकावून लावले. घाटकरवाडी व वेळवट्टी परिसरात असलेल्या दोन्ही हत्तींकडून मेसकाठी, ऊस, नारळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमरजित पवार यांनी हत्तींचा मागोवा घेण्यासाठी सात ते आठ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे.

दररोज या पथकाकडून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री वनरक्षक नागेश खोराटे, एस. एस. लटके, शिवाजी मटकर, संभाजी पवार, बबन बार्देस्कर हे वनकर्मचारी हत्तींचा मागोवा घेत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास घाटकरवाडी येथील गवुळदेव नावाच्या शेतात रस्त्याकडेला टस्कर असल्याचे दिसून आले.

अचानक टस्कर समोर दिसल्याने कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. मात्र, सर्वांनीच सावधानता बाळगत टस्करला न बिथरता जंगलाच्या दिशने हुसकावून लावले. टस्कराने गोविंद पाटील यांच्या एक ते दीड एकरातील उस, नारळ व मेसकाठींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गवुळदेव नावाच्या शेतात अशोक पाटील, प्रकाश तांबेकर, बाबाजी अडकूरकर, मारुती पाटील, गुरुनाथ पाटील यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.

वेळवट्टी व हाळोली परिसरात असणाऱ्या दुसऱ्या टस्कर हत्तीने ऊस, नारळ व केळी पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मसोली, हाळोली, वेळवट्टी, देवर्डे परिसरात हत्तींचा धुडगूस सुरूच असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------------

* हत्तींबरोबरच गव्यांचाही उपद्रव वाढला

हत्ती व गव्यांच्या दहशतीने शेतकऱ्यांची रात्रीची राखणही बंद झाली आहे. रात्रीच्या वेळी या जंगली जनावरांकडून शेतकऱ्यांच्या हिरव्या सोन्यावर डल्ला मारला जात आहे. हत्तीपाठोपाठ गव्यांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

---------------------------

* फोटो ओळी : घाटकरवाडी (ता. आजरा) येथील गवुळदेव नावाच्या शेतात कर्मचाऱ्यांच्या पथकासमोर आलेला टस्कर.

क्रमांक : १२०३२०२१-गड-०१

Web Title: Tusker elephant poaching in Velvatti area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.