शिवडाव येथे टस्कर हत्तीचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:46+5:302021-06-06T04:18:46+5:30
पाच दिवसांपूर्वी शिवडाव येथे दाखल झालेल्या टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून, ऊस व अन्य पिकांचे नुकसान केले आहे. या ...
पाच दिवसांपूर्वी शिवडाव येथे दाखल झालेल्या टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून, ऊस व अन्य पिकांचे नुकसान केले आहे. या भागात असणारे मुबलक फणस व मेसकाठी खायला मिळत असल्यामुळे आणि राहण्यासाठी जंगल असल्याने टस्करने रेडे ओहळ जंगलाचा आसरा घेतला आहे. दिवसा जंगलात तर रात्री नागरीवस्तीत हत्ती येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, वनविभागाचे वनपाल के. डी. जमादार, एस. डी. इंदुलकर, वनरक्षक जॉन डिसोझा, एन. बी. सोनटके, विजय शिदे आणि वनमजूर यांनी रात्री पेट्रोलिंग करत हत्तीला नागरी वस्तीकडे येण्यास रोखण्यासाठी फटाके लावत आहेत. तरीही हत्तीकडून हुलकावणी मिळत असल्याने वन विभागातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, हत्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी करू नये, तसेच हत्तीचा वावर असलेल्या शेतामध्ये आणि गावातील शिवारामध्ये ग्रामस्थांनी रात्रीच्यावेळी जाऊ नये, असे आवाहन वन विभाग व शिवडाव गावच्या ग्रामसमितीने नागरिकांना केले आहे.
फोटो : शिवडाव येथील जंगलात असलेला टस्कर हत्ती.