सेनापती कापशीसह तमनाकवाडा परिसरात टस्कर हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:11+5:302021-02-26T04:34:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : आजरा-आंबोली परिसरात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती बुधवारी मध्यरात्री सेनापती कापशी (ता. कागल) येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : आजरा-आंबोली परिसरात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती बुधवारी मध्यरात्री सेनापती कापशी (ता. कागल) येथे दाखल झाला. गुरुवारी दिवसभरही तो येथील उसाच्या फडामध्ये बसून राहिला. सेनापती कापशीसह तमनाकवाडा परिसरात टस्करने धुमाकूळ घातला. या परिसरात ऊसतोड सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी पाचनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत टस्करला फडातून बाहेर हुसकावले, पण मोठ्या प्रमाणात असणारे ऊस पीक व जमावाचा गोंधळ यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
बुधवारी रात्री सेनापती कापशी येथील चिगरे माळ परिसरातील कुत्री जोरात भुंकू लागली. यावेळी वस्तीवरील शेतकऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले असता शेतातील खोपी शेजारी हत्ती उभा असलेला दिसला. भीतीने शेतकऱ्यांनी दार बंद करून घेतले.
रात्रभर टस्कर परिसरात धुमाकूळ घालत होता. पहाटे साडेसहाच्या सुमारास हा टस्कर माघारी फिरला व तमनाकवाडा गावच्या दिशेने गेला, पण तमनाकवाडा याठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणात जमला. व्हिडिओ व फोटो घेण्यासाठी तरुणांनी टस्करचा पाठलाग केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. बघ्यांची गर्दी व आरडाओरडा यामुळे हत्ती बिथरला व पुन्हा नऊच्या सुमारास माघारी कापशीच्या दिशेने फिरला.
कापशी व तमनाकवाडा या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने टस्कर नाईकवाडे मळा परिसरातील रामचंद्र राठवळ यांच्या उसाच्या फडामध्ये शिरला. याठिकाणी दिवसभर टस्कर उसाच्या फडामध्येच ठाण मांडून उभा राहिला. दरम्यान, कागल, गडहिंग्लज, आजरा येथील वनक्षेत्रपाल अधिकारी व वन कर्मचारी टस्करच्या हलचालीवर लक्ष ठेवून आहेत. टस्करला आजरा परिसरातील मूळ अधिवासात हुसकावून लावताना वन विभागाची दमछाक होत आहे.
हा टस्कर आंबोली-आजरा परिसरातील आहे. उत्तूर मार्गे तो या परिसरात आला आहे. सध्या हा टस्कर शांत असून आल्या मार्गाने तो निघून जाईल. मोठ्या प्रमाणात जमाव आरडाओरड करू लागल्याने तो माघारी फिरला आहे. या पार्श्वभूमीवर टस्करचा वावर असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवावीत. याकरिता ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे.- अमरजित पोवार, आजरा वनक्षेत्रपाल
२५ कापशी एलिफंट
फोटो:- १)सेनापती कापशी (ता.कागल) येथील नाईकवाडे मळा परिसरात दाखल झालेला टस्कर हत्ती २) टस्कर असलेल्या ऊसाच्या फडापासुन जमावास मज्जाव करताना पोलीस व वन अधिकारी ३) टस्करला हुसकावून लावताना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी
फोटो:- सार्थक फोटो