video: मसोली गावात टस्कर घुसला, कुत्री पाठीमागे लागल्याने मोठ्याने चित्तकारला; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 01:15 PM2023-06-17T13:15:09+5:302023-06-17T13:16:30+5:30
अकरा वर्षांपासून आजरा तालुक्यात वास्तव्यास
आजरा : मसोली (ता. आजरा) गावातच टस्कर हत्ती (चाळोबा गणेश) घुसल्याने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. गेली १० ते ११ वर्षांपासून हा टस्कर हत्ती आजरा तालुक्यात वास्तव्यास आहे.
चाळोबा गणेश नावाने ओळखला जाणारा टस्कर हत्ती गेली ११ वर्षे आजरा तालुक्यात वास्तव्यास आहे. दिवसा चाळोबा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या हिरव्या सोन्यावर डल्ला मारत त्याचा दिनक्रम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चंदगड भागात असणारा मोठा टस्कर (अण्णा) आजरा भागात दाखल झाला आहे. त्यामुळे चाळोबा गणेश टस्कराने आपली जागा बदलण्यासाठी पहाटेच्या वेळेला तो गावात घुसला असण्याची शक्यता आहे.
टस्कर हत्ती सुनील गुरव यांच्या परसातून गावातील मुख्य रस्त्यावर आला. अचानक टस्कर हत्ती दारात आल्यामुळे नागरिकांनी पटापट दरवाजे बंद केले व खिडकीतूनच त्याचे दर्शन घेतले. हत्ती कोणालाही त्रास न देता तो पाण्याचा शोध घेत होता; मात्र त्याला पाणी सापडले नाही.
दरम्यान, गावातील पाळीव कुत्री टस्कर हत्तीच्या पाठीमागे लागल्यामुळे तो मोठ्याने चित्तकारला. त्यानंतर टस्कर हत्ती मसोली-रायवाडा रस्त्यावरून पुन्हा चाळोबा जंगलात गेला आहे. गावाशेजारी असणारा टस्कर हत्ती आज गावातच घुसून त्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे आज दिवसभर मसोली परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर: आजरा तालुक्यातील मसोली गावात हत्तीचा फेरफटका.#kolhapurpic.twitter.com/PsoTFd85xz
— Lokmat (@lokmat) June 16, 2023