बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:17+5:302021-07-02T04:17:17+5:30
बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण १ लाख १७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ...
बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण १ लाख १७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दि. ३ जून रोजी जाहीर केला. राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचे मूल्यमापन हे दहावी, अकरावी वार्षिक गुण आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, गेल्यावर्षी कोरोनामुळे अकरावीची वार्षिक परीक्षा झाली नाही. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांच्या बारावीतील अंतर्गत परीक्षा देखील झालेल्या नाहीत. मूल्यमापनाचे सूत्रही अद्याप निश्चित झालेले नाही. अधिकतर विद्यार्थी हे अकरावीला रेस्ट इयर मानतात. मूल्यमापनात या इयत्तेतील ४० टक्के गुणांचा विचार झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पॉईंटर
कोल्हापूर विभागातील बारावीतील विद्यार्थी
कला : ३४०९३
वाणिज्य : २७६७३
विज्ञान : ५००७६
एमसीव्हीसी : ५८४१
टेक्निकल : ६८
चौकट
बारावीसाठी असे गुणदान होण्याची शक्यता
सीबीएसईने बारावीच्या मूल्यमापनासाठी ३० : ३० : ४० (दहावी : अकरावी : बारावीचे गुण) असे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने निर्णय घ्यावा, अशी काही पालक संघटनांकडून मागणी होत आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून २०:४०:४० (दहावी : अकरावी : बारावीचे गुण) या सूत्राचा विचार केला जात आहे. हे सूत्र निश्चित झाल्यास त्यानुसार गुणदान होण्याची शक्यता आहे.
चौकट
गेल्यावर्षी अकरावीची वार्षिक परीक्षाच झाली नाही
इयत्ता अकरावीचा निकाल दोनशे गुणांच्या आधारे लावण्यात येतो. त्यात दोन घटक चाचणीचे प्रत्येकी २५ गुण, सहामाही परीक्षेतील ५० गुण, वार्षिक परीक्षेच्या १०० गुणांचा समावेश असतो. गेल्यावर्षी यातील केवळ वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यामुळे दोन घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेच्या आधारे अकरावीचे मूल्यमापन झाले.
चौकट
बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?
इयत्ता बारावीतील कला, वाणिज्य विद्याशाखेमध्ये तोंडी परीक्षा अथवा प्रकल्पांना २० गुण असतात. विज्ञान विद्याशाखेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेला ३० गुण असतात.
चौकट
अकरावी तर ‘रेस्ट इयर’
महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीमध्ये वर्षभर अभ्यासाचा तणाव सहन करून विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये येतात. पुढे उच्च शिक्षणाच्यादृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने बहुतांश विद्यार्थी हे अकरावीकडे ‘रेस्ट इयर’ म्हणून पाहतात. केवळ अकरावी उत्तीर्ण होण्याला ते महत्त्व देतात.
प्राचार्यांच्या प्रतिक्रिया
दहावीला मेरिटमध्ये असणारे विद्यार्थी शक्यतो अकरावीकडे दुर्लक्ष करत नाही. त्यांची संख्या कमी असते. मात्र, बहुतांश विद्यार्थी अकरावीकडे फक्त उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने पाहतात. अशा विद्यार्थ्यांच्या गुणदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य, न्यू कॉलेज.
बारावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अकरावीत कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा फटका बसण्याची शक्यता आहे.
-पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज.
विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता
बारावीसाठी आमचे मूल्यमापन करण्यात दहावीचे २०, अकरावीचे ४० आणि बारावीतील ४० गुणांचा आधार घेणे हे सूत्र मला योग्य वाटते. शिक्षण मंडळाने या सूत्राचा विचार करणे आवश्यक आहे.
-प्रतीक पाटील, सुळे.
आमची परीक्षा रद्द करून आता महिना होत आला आहे. आमच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार करून राज्य शासनाने लवकर मूल्यमापनाचे सूत्र निश्चित करून निकाल जाहीर करावा.
-पल्लवी संकपाळ, कंदलगाव.
010721\01kol_6_01072021_5.jpg
डमी (०१०७२०२१-कोल-स्टार ८७२ डमी)